राज्यपालांच्या उपस्थितीत गिरीश ओक, मृणाल कुलकर्णी यांचे मनोज्ञ अभिवाचन
मुंबई : मराठी भाषा हा हिरा आहे, त्याचे जतन झाले तर संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी येथे केले. प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या घरी मराठीत संवाद साधावा आणि मुलांना मराठी बोलण्यास व लिहिण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २७) राजभवन येथे ‘माय लेकरं’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिवाचन, काव्यवाचन आणि गायनाच्या माध्यमातून आई-मुलाच्या नात्याचा हृद्य गोफ उलगडण्यात आला. राज्यपालांनी संपूर्ण दोन तास हा कार्यक्रम पाहिला.
राज्यपाल म्हणाले, “आपण राज्यपाल पदावर असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. तामिळ भाषेसाठी अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झाला, मात्र मराठीला तुलनेने कमी प्रयत्नांतच हा दर्जा मिळाला.”
त्यांनी पुढे सांगितले, “भाषा टिकली, तर संस्कृती टिकेल. परंतु आपल्याजवळ असलेला हा ‘हिरा’ ओळखला नाही, तर काहीजण त्याचा केवळ पेपरवेट म्हणून उपयोग करतील. तसे होऊ नये.”
महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्या सांस्कृतिक संबंधांवर भाष्य करताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी आणि वेल्लोर मोहिमांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “तंजावरच्या भोसले राजघराण्याने मराठी संस्कृतीच्या जतनासोबतच तामिळ साहित्याचेही संरक्षण केले. सरस्वती महाल ग्रंथालयातील दुर्मिळ तामिळ ग्रंथ याच भोसले घराण्याने जतन केले आहेत.”
राज्यपालांनी इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली. “इंग्रजी शिकणे आवश्यक आहे, मात्र प्रत्येक मराठी कुटुंबाने घरी आग्रहाने मराठी भाषा बोलली पाहिजे. पालकांनी मुलांना दिवसातून किमान एक पान तरी मराठीत वाचण्यास प्रवृत्त करावे,” असे त्यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेत शिक्षणाचा पुरस्कार करण्यात आल्याचा उल्लेख करत, “अनेक विद्यापीठांमध्ये आज मराठीतून पुस्तके प्रकाशित होत आहेत. मात्र, आपली भाषा केवळ शिक्षणापुरती न राहता ती रोजच्या वापरात राहिली पाहिजे,” असे राज्यपाल म्हणाले.
“आज मोबाईलमुळे भाषिक लिखाणाचा सराव राहिलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने घरी किमान एक मराठी वृत्तपत्र ठेवावे आणि नियमित वाचावे. यामुळे वाचनाची सवय लागेल आणि भाषेचे संवर्धन होईल,” असे राज्यपालांनी स्पष्ट केले.
पुण्यातील ‘कलांगण’ संस्थेच्या वतीने ‘माय लेकरं’ या हृद्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अरुणा ढेरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात डॉ. गिरीश ओक व मृणाल कुलकर्णी यांनी हृदयस्पर्शी अभिवाचन सादर केले. चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. बहिणाबाई चौधरींपासून ते समकालीन कवींपर्यंतच्या आई-मुलाच्या नात्यावर आधारित कवितांचे आणि उताऱ्यांचे वाचन या कार्यक्रमात करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित दाते यांनी केले, तर चैत्राली अभ्यंकर यांनी आभारप्रदर्शन केले.