पुणे: स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून फरार झालेला आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसाच्या फडात दोन दिवस लपून बसल्यानंतर, भूक आणि तहान सहन न झाल्याने तो बाहेर पडला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
गाडेच्या शोधासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. गावातील पोलीस पाटील आणि नातेवाईकांनी अनाउन्समेंट करून त्याला शरण येण्याचे आवाहन केले.
मध्यरात्री गाडे गावातील एका घरात पाणी मागण्यासाठी गेला असता, घरातील लोकांनी त्याला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला. काही वेळ त्याने तयारी दाखवली, मात्र लगेचच तेथून निघून गेला.
उसाच्या फडात लपलेल्या गाडेने अन्न आणि पाण्याविना दोन दिवस काढले. शेवटी, उपाशीपोटी राहणे अशक्य झाल्याने तो बाहेर आला, आणि पोलिसांनी लगेचच त्याला ताब्यात घेतले.
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे ही शोध मोहीम यशस्वी झाली. गाडेच्या अटकेनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.