मुंबई: संगीतकार आणि गायक ऋषभ टंडन यांनी तब्बल 14 वर्षांनंतर मोठ्या दिमाखात पुनरागमन केले आहे. 2010 मध्ये “फिर से वही” या अल्बममधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ऋषभ टंडन यांची “इश्क फकीराना” ही नवीन म्युझिकल सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली असून, ती एशियातील पहिली संगीतमय सिरीज ठरली आहे.
ही सिरीज त्यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांची जोडीदार ओलेसा नेडोबेगोवा यांच्यासोबतच्या प्रेमप्रवासाचे सुंदर चित्रण यात साकारले आहे. आपल्या वास्तविक आयुष्याच्या अनुभवांवर आधारित संगीतमय सिरीज साकारण्याचा हा अनोखा प्रयत्न प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे.
“‘इश्क फकीराना’च्या चित्रीकरणादरम्यान आम्ही अत्यंत सुंदर क्षण अनुभवले. ही केवळ माझ्या पुनरागमनासाठी महत्त्वाची नाही, तर ही माझ्या जीवनकथेवर आधारित असल्यामुळे आणखी खास आहे,” असे ऋषभ टंडन म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “जेव्हा मी ओलेसाला माझ्या आयुष्यात पाहिले, तेव्हा प्रेमावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला. ती एक आदर्श जीवनसाथी आहे, जिला प्रत्येक सुख-दुःखात साथ देणे ठाऊक आहे. उज्बेकिस्तानमध्ये शूटिंग दरम्यान मी प्रकृती अस्वस्थ असल्याने त्रस्त होतो, पण तिने ज्या प्रकारे माझी काळजी घेतली आणि मला लहान मुलासारखे जपले, ते खरोखर जादुई होते. आता माझी ही प्रेमकथा जगासमोर आणताना मला आनंद होत आहे. ज्यांनी प्रेमावरील विश्वास गमावला आहे, त्यांच्यासाठी ही सिरीज आशेचा नवा किरण ठरेल.”
“इश्क फकीराना” ही एशियातील पहिली म्युझिकल सिरीज आहे, आणि तिचे सौंदर्यशास्त्र, चित्रीकरण, तसेच निर्मिती उच्च दर्जाची आहे. ही अनोखी उपलब्धी साध्य करताना आनंद होत आहे. आमच्या सिरीजला मिळत असलेल्या प्रेमासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुढील काळातही तुमच्या पाठिंब्याची आम्हाला अपेक्षा आहे,” असे ऋषभ टंडन यांनी सांगितले.