मुंबई – युवानेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांनी नुकताच दक्षिण आफ्रिकेचा अभ्यासदौरा केला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या सौजन्याने ‘द फोरम ऑफ यंग ग्लोबल लीडर्स’च्या सहभागातून आणि केप टाऊन विद्यापीठाच्या ‘ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस’मार्फत हा आठवडाभर चाललेला अभ्यासक्रम पार पडला.
या दौऱ्यात जगभरातील युवा नेत्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंविषयी सखोल माहिती घेतली. दक्षिण आफ्रिकेचा समृद्ध इतिहास, त्याचा स्वातंत्र्यलढा, सामाजिक संघर्ष आणि उन्नतीसाठी केलेले प्रयत्न याबाबत त्यांनी जवळून अभ्यास केला.
दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्र्यांपासून केप टाऊनच्या महापौर आणि उपमहापौरांपर्यंत, तसेच सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि शहरी नियोजन तज्ज्ञांसोबत त्यांनी विचारमंथन केलं. या संवादातून महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्या संधी, धोरणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या यशस्वी प्रयोगांबद्दल मोलाची माहिती मिळाली.
दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अखिल चित्रे यांनी आपल्या कॅलेंडरच्या थीमला ‘आदित्योदय’ असे नाव दिल्याचे सांगितले. अनेकांनी याला ठाकरे यांचं स्तुतीगान समजलं, मात्र त्या नेत्याने स्पष्ट केलं की, यामागे अधिक व्यापक विचार होता. महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अस्थिर असताना, अनेक अडथळ्यांवर मात करत आदित्य ठाकरे सातत्याने स्वतःला तयार करत आहेत. अशा आशादायी नेतृत्वाच्या उदयाला ‘आदित्योदय’ म्हणणं उचित असल्याचं त्यांनी नमूद केलं.