महाड – छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाण्यासाठी पर्यटक व शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात. विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोयीस्कर असणारा हिरकणी वाडी येथील रायगड रोपवे तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी ३ मार्च ते ७ मार्च २०२५ या कालावधीत बंद राहणार आहे. रायगड रोपवेचे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेला किल्ले रायगड पाहण्यासाठी राज्यभरातून तसेच देश-विदेशातून हजारो पर्यटक, शालेय विद्यार्थी, इतिहासप्रेमी आणि शिवभक्त येथे येतात. रायगडाच्या पायऱ्यांद्वारे चढाई करणे अनेकांसाठी कठीण असल्याने हिरकणी वाडी येथील रायगड रोपवे हा प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय ठरतो.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे रायगड रोपवे १९९६ साली कै. विष्णू महेश्वर जोग (व्ही. एम. जोग) यांनी स्थापन केला. त्यांच्या पुढाकारामुळे आज लाखो पर्यटक, शासकीय अधिकारी, राज्य व केंद्र सरकारचे मंत्री, तसेच वृद्ध, दिव्यांग आणि शालेय विद्यार्थी सहजपणे रायगडावर पोहोचू शकतात.
तांत्रिक दुरुस्तीसाठी ३ मार्च ते ७ मार्च या कालावधीत रायगड रोपवे बंद राहणार असल्याने पर्यटक आणि शिवभक्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रायगड रोपवे प्रशासनाने केले आहे.