मुंबई : “देवभूमी गोव्यात अनेक रत्ने जन्माला आली, त्यापैकी एक तेजस्वी तारा म्हणजे स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ संपादक लक्ष्मीदास बोरकर,” असे गौरवोद्गार केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी, ज्येष्ठ पत्रकार, आणि लेखक लक्ष्मीदास बोरकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात नाईक बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “समस्यांची अभ्यासपूर्ण जाण असलेल्या आणि लेखणीतून अचूक उपाय सुचवणाऱ्या बोरकरांनी समाजसेवेस मोलाचे योगदान दिले. पोर्तुगीज सत्तेचा बंदीहुकूम झुगारून त्यांनी राम मनोहर लोहिया यांना गोव्यात सभास्थानी आणले, त्यातून झालेली अटक आणि छळ त्यांनी सहन केला. त्यांच्या लेखनात गोडवा होता, पण ते लेखन हे दुर्बलांचा आवाज होते.”
नाईक यांनी बोरकरांच्या सामाजिक जाणिवा, पत्रकारितेतील योगदान आणि सत्यप्रिय वृत्तीचे स्मरण करत “त्यांचा आदर्श जपणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,” असे सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित दै. नवप्रभाचे माजी संपादक सुरेश वाळवे भावुक होत म्हणाले, “मी बोरकरांच्या हाताखाली घडलो. त्यांनी पितृवत प्रेम दिलं. एक चूक केल्यावर मी राजीनामा दिला होता, पण त्यांनी माझं राजीनामा पत्रच फाडून टाकलं. गोव्यासाठी त्यांचं योगदान अतुलनीय आहे.”
लोकसत्तामधील त्यांच्या सहकाऱ्यांपैकी प्रकाश कुलकर्णी म्हणाले, “आज संपादक चूक उपसंपादकाच्या नावावर ढकलतात, पण बोरकर स्वतः बातम्या करत असत. त्यांच्या उपस्थितीनं कार्यालयात चैतन्य निर्माण होई. ते साक्षात पत्रकारितेचे चैतन्य होते.”
कुलकर्णी यांनी हेही नमूद केले की, “ते न्यूज एडिटर झाले, पण लोकसत्तेत संपादक होऊ शकले नाहीत, ही खंत आजही राहते.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी बोरकरांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. तसेच, तीन पुस्तकांच्या आवृत्त्यांचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत कोषाध्यक्ष जगदीश भोवड यांनी, आभार प्रदर्शन संजय तांबेकर यांनी, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले.
Jai U. Nayak, sr. Journalist, Panaji Goa
April 5, 2025‘सातबाऱ्या’ नव्हे सातबारा
गोव्यात त्याला ‘एक चौदा’ चा उतारा म्हणतात.
पत्रकारितेच्या विषयावर माझे “प्रत्यक्ष पत्रकारिता” नामक पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. अमेझॉन वर उपलब्ध आहे.