मुंबई : “मुंबईकरांची घराची समस्या दूर करण्यासाठी सामूहिक पुनर्विकास योजना राबवली जाईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रभादेवी येथील सहा पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी करताना शिंदे म्हणाले, “मुंबईकरांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आवश्यकतेनुसार नियम व कायद्यांमध्ये बदल केले जातील.”
ते पुढे म्हणाले, “सामान्य मुंबईकरांना परवडणारी, प्रशस्त घरे देण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने सामूहिक पुनर्विकास योजना राबवली जाईल. यामध्ये आरोग्य सुविधा, बगीचा, खुले मैदान इत्यादी प्राथमिक सोयीसुविधा प्रदान केल्या जातील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून, याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. लवकरच गृहनिर्माण धोरण आणले जाईल, ज्यामध्ये म्हाडाच्या माध्यमातून विविध गटांसाठी घरांची उपलब्धता आणि परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी 500 कोटी रुपयांची विकास योजना राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे गणेश भक्तांना सोयी सुविधा मिळतील, असेही शिंदे यांनी सांगितले.
शिंदे यांच्या उपस्थितीत दादर, माहिम आणि प्रभादेवी येथील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा बैठक पार पडली.