मुंबई : गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आणण्याच्या सरकारच्या दाव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. गडचिरोलीत माजी सभापतीची नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर, तेथील परिस्थिती अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी एका ट्वीटद्वारे नमूद केले आहे.
रोहित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढत म्हटले आहे की, “सुधारणांच्या नावाखाली स्थानिक आदिवासी जर पोलीस, प्रशासन, नक्षलवादी आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या कचाट्यात सापडून प्राणास मुकत असतील, तर ही बाब चिंताजनक आहे.”
गडचिरोली पालकमंत्री पदाचा संघर्ष जनसेवेसाठी की काही वेगळेच कारण?
स्व. आर. आर. पाटलांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाला प्रतिष्ठेचे स्थान दिले, मात्र त्यांच्या काळात तेथील लोहखननाचे मोठे अर्थकारण नव्हते. आजच्या घडीला, गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदासाठी राजकीय नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमागील कारण जनसेवा आहे की इतर कोणते स्वार्थ, हा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
“पुण्यात कोयता गँग वाढली तशी गडचिरोलीत नक्षलवाद वाढू नये”
ते पुढे म्हणाले, पुण्यात ज्या पद्धतीने कोयता गँगचा विळखा बसला, तसाच नक्षलवादाचा विळखा गडचिरोलीत घट्ट होऊ नये. सरकारने दाखवलेले चित्र आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत राहणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्व. आर. आर. पाटील यांनी स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन विकासाची वाट तयार केली होती. त्याच धर्तीवर फडणवीस यांनी गडचिरोलीतील गरीब आदिवासींना या दुष्टचक्रातून बाहेर काढावे, अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमधून केली आहे.