ताज्या बातम्या मुंबई

मुंबई विकासापासून दूर का?

उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई: मुंबईच्या विकासाकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्प आणि उद्योग गुजरातला हलवले जात आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत विचारले, “सबका साथ, सबका विकास” म्हणणाऱ्या केंद्र सरकारच्या विकासात मुंबई येत नाही का? महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कंपन्या आणि प्रकल्प गुजरातला हलवण्यामागे नेमकं काय राजकारण आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, वाढवण बंदर प्रकरण आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या दिरंगाईवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

बीडीडी चाळ पुनर्विकास केंद्र सरकारमुळे रखडला – सावंत

खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या विलंबाबाबत केंद्र सरकारला जबाबदार धरले.
ते म्हणाले, “शिवडीतील बीडीडी चाळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. राज्य सरकारने पुनर्विकासासाठी प्रयत्न केले, मात्र गेल्या दहा वर्षांत केंद्राने परवानगीच दिली नाही. तरीही भाजप सरकार सर्वांसाठी घरे योजनेची टिमक्या मिरवत आहे.”

मुंबई-गोवा महामार्गाला चंद्रयानाइतका खर्च, पण काम अपूर्णच!

मुंबई-गोवा महामार्गाच्या दिरंगाईवर टीका करताना सावंत म्हणाले,
“चांद्रयान मोहिमेसाठी जितका खर्च झाला, तितकाच खर्च पनवेल ते माणगाव या पट्ट्यात करण्यात आला. पण अजूनही महामार्ग अपूर्ण आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे हा महामार्ग पूर्ण होणार की नाही, याची शंका आहे.”

मुंबई बंदर दुर्लक्षित, वाढवण बंदरावर सरकार आग्रही?

मुंबईतील बंदराच्या विकासाकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही, मात्र वाढवण बंदर प्रकल्पासाठी सरकार आक्रमक आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. ते म्हणाले, “मुंबईने काय गुन्हा केला, जो केंद्र सरकार शहरावर राग काढत आहे? गुजरातसाठी मुद्रा बंदर विकसित होतं, पण मुंबई बंदरावर दुर्लक्ष का?”

मनमोहन सिंग आणि भाजप सरकारवर निशाणा

भाषणाच्या सुरुवातीलाच सावंत यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाचा उल्लेख करत भाजप सरकारवर टीका केली.
“जीएसटी आणि आधार कार्ड योजनांना आधी भाजपाने विरोध केला, पण नंतर तेच त्यांनी स्वीकारलं. मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेला वाचवलं, मात्र भाजप सरकार केवळ जाहिरातींचा खेळ खेळत आहे,” असे सावंत म्हणाले.

शेतकरी योजना आणि शिक्षणावरही सरकारवर हल्लाबोल

शेतकरी सन्मान योजनेवर बोलताना सावंत म्हणाले, “शेतकऱ्यांना केवळ ६,००० रुपये देणं पुरेसं नाही. सरकारने बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केलं, मात्र शेतकऱ्यांसाठी काही ठोस योजना आणल्या का?”

त्याचप्रमाणे, शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभारावरही त्यांनी टीका केली. *“गावात एकच शिक्षक पहिलीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. शिवाय, बीएसईसी आणि सीबीएसई शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे धडे नाहीत, हे दुर्दैवी आहे, असेही सावंत यांनी नमूद केले.

बीएसएनएलला संपवण्याचे षड्यंत्र?

केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” अभियानावर टीका करताना सावंत म्हणाले,
“सरकारने आत्मनिर्भर भारताचा नारा दिला, पण बीएसएनएलसारख्या सरकारी कंपन्यांना संपवले जात आहे. बीएसएनएलचे नेटवर्क शहरांपेक्षा गावात जास्त पोहोचते, मात्र तरीही सरकार मित्र उद्योगपतींना फायदा मिळवून देण्यासाठी खासगी टेलिकॉम कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे.”

मुंबईच्या विकासावर केंद्र सरकारचा आकस?

सावंत यांनी संपूर्ण भाषणात केंद्र सरकारने मुंबईच्या विकासाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला.
“आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करत आहे? इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, महामार्ग, बंदरे आणि पुनर्विकासाच्या योजनांमध्ये केंद्र सरकार महाराष्ट्राची गळचेपी करत आहे,” असे ते म्हणाले.

मुंबईतील विकासाच्या मुद्द्यावरून लोकसभेत मोठी चर्चा रंगली, मात्र सरकारने यावर काय भूमिका घेतली, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज