शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे यांचा सवाल — फलोत्पादन मंत्री भरत गोगावले पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
महाड – राज्यातील महायुती सरकारमधील फलोत्पादन मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या पुत्राने, विकास गोगावले यांनी कोणतेही संवैधानिक पद नसताना, शासकीय बांधकाम कामगार मंडळाचा कार्यक्रम स्वतःच्या हस्ते पार पाडल्याचा आरोप शिरगाव गावचे सरपंच व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी केला आहे.
या आरोपांनंतर गोगावले कुटुंबावर राजकीय टीकेची झोड उठली असून, रायगड जिल्ह्यात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे.
महाड येथील वीरेश्वर देवस्थान मंदिर सभागृहात महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत एक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री गोगावले यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. शासकीय नियमांनुसार अशा कार्यक्रमांचे उद्घाटन संवैधानिक पदावरील अधिकाऱ्यांच्या हस्तेच होणे अपेक्षित असताना, मंत्री पुत्राकडून कार्यक्रम पार पडल्याने ओझर्डे यांनी तीव्र आक्षेप घेतला.
कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न करत असताना सरपंच सोमनाथ ओझर्डे यांना महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि शहर पोलीस निरीक्षक तडवी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशबंदी केली.
याबाबत ओझर्डे म्हणाले, “हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा नव्हता; महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा होता. मग मला जाण्यास मज्जाव का? मी सरपंच असूनसुद्धा शासनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास अडवले गेले.”
पोलिसांनी “सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेतला” असे सांगितले असले तरी, ओझर्डे यांनी हा प्रकार राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप केला.
ओझर्डे पुढे म्हणाले, “विकास गोगावले कोणत्याही निवडणुकीतून निवडून आलेले नाहीत. मग त्यांच्या हस्ते शासकीय कार्यक्रम कसा होतो? या माध्यमातून फक्त शिंदे गटाच्या लोकांनाच लाभ दिला जात आहे, इतरांना वगळले जाते.”
त्यांनी आरोप केला की, या योजनांच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि शासनाची फसवणूक होत आहे. त्यामुळे ते लवकरच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य अधिकारी कुंभार यांच्याकडे मंत्री भरत गोगावले आणि त्यांचा पुत्र विकास गोगावले यांच्या विरोधात औपचारिक तक्रार दाखल करणार आहेत.
ओझर्डे म्हणाले, “ही हुकूमशाही आहे. पोलिसांनी जर माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले, तर त्यांनी मला संरक्षण द्यावे. पण संरक्षण न देता शासकीय कार्यक्रमात जाण्यापासून अडवणे म्हणजे आमच्या संवैधानिक अधिकारांचा भंग आहे.”
रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतःहून संरक्षण दिल्याबद्दल ओझर्डे यांनी आभार मानले. मात्र, “महाडमध्ये मंत्री गोगावले यांचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालतो आहे, त्याला आमचा ठाम विरोध राहील,” असे ते म्हणाले.