दादर, मुंबई: मुंबईतील प्रत्येक रेल्वे पोलीस बांधवाला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार या घरांची उभारणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
मा. कदम यांनी आज दादर (पूर्व) येथील रेल्वे पोलीस वसाहतीला भेट देऊन तेथील पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांनी वसाहतीची पाहणी करून पायाभूत सुविधा आणि राहणीमानाबाबत सविस्तर माहिती घेतली.
सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावर पसरलेल्या या वसाहतीत सध्या २८० पेक्षा अधिक पोलीस कुटुंबीय राहतात. या जागेवर उंच मजली इमारती उभारल्यास हजाराहून अधिक कुटुंबांना निवासाची सुविधा मिळू शकते. त्यामुळे मुंबईतील रेल्वे पोलिसांच्या निवास समस्येचे निराकरण होऊ शकते, असे कदम यांनी नमूद केले.
राज्य शासनाने या संदर्भात सकारात्मक पावले उचलली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन कदम यांनी पोलीस कुटुंबीयांना दिले.
ते पुढे म्हणाले, “पोलीस गृहनिर्माण संस्थांमार्फत राज्यभरात गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात आले असून, त्यात अधिक गतिमानता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पोलीस दल हे राज्याच्या सुरक्षेचे आधारस्तंभ आहेत, आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयी-सुविधांचा विकास हा शासनाचा प्राधान्यक्रम आहे.”
या प्रसंगी माजी नगरसेवक अमेय घोले, संबंधित पोलिस अधिकारी आणि पोलीस कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

