X: @therajkaran
नागपूर: राज्यातील जवळपास सर्वच शहरांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशाचे उज्वल भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी दहा वाजता असावी, या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आम्ही शासनाकडे याबाबत विचारणा केली होती. तरीही शासनाला जाग आली नाही. परंतु राज्यपाल महोदयांनी संवेदनशिलपणे विचार करून शाळेच्या वेळा बदलण्याचे निर्देश दिले. राज्यपाल महोदयांना जे सुचले ते राज्य शासनाला का नाही सुचले, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षननेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. श्री. वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक मधील बहुसंख्य मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात आहे. शाळांचा पहिला तास सात वाजता किंवा आठ वाजता सुरू होतो. त्यामुळे मुलांना पहाटे साडेपाच किंवा सहा वाजता घाईगडबडीत उठून अर्धपोटी किंवा नाश्ता न करताच शाळेत जावे लागते. परिणामी आवश्यक असणारी सात ते आठ तासांची झोप व पुरेसा आहार मुलांना मिळत नाही. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर याचा विपरित परिणाम होतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही विद्यार्थ्यांची झोप केवळ सहा-सात तासच होते. याचा परिणाम पालकांवर देखील होत असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांची पुरेशी झोप न झाल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते. तसेच अपूर्ण झोपेमुळे विद्यार्थी दशेतच आजार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. तरूण पणात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारासारखे गंभीर आजार सुरू झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी सरकारने संवेदनशिलपणे विचार करून कार्यवाही करावी, असेही श्री.वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
Also Read: दर तासाला एक या वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विरोधी पक्षांचा आरोप