मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या “माझी लाडकी बहीण” योजनेने विधानसभा निवडणुकीत गेमचेंजरची भूमिका बजावली. जानेवारीपर्यंतच्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले असले तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे निराश झालेल्या महिलांसाठी सरकारने महिला दिनानिमित्त डबल गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.
महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी “माझी लाडकी बहीण” योजनेतील मदत 1500 वरून 2100 रुपये करू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, विधानसभा अधिवेशनात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
त्यांनी स्पष्ट केलं की, सरकारचा जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो, त्यामुळे लगेच 2100 रुपये देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अर्थसंकल्पातही यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही, असं सांगण्यात आले.
महिला दिनाच्या निमित्ताने दोन महिन्यांचे पैसे मिळणार असले तरी 2100 रुपयांचे आश्वासन हवेत विरल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. विरोधकांनी यावर टीका करत महायुती सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
महिला दिनानंतर सरकार याबाबत स्पष्टीकरण देते का, आणि 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.