मुंबई : पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्ता गाडे याच्या चौकशीतून रोज नवनवीन धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. पोलिसांच्या कसून तपासात गाडे पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानक परिसरात मुक्तपणे फिरत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या तपासात दत्ता गाडे याचा पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, सोलापूर आणि शिरूर एसटी स्थानकांमध्ये वावर आढळून आला आहे. त्यामुळे त्याने इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर गाडेविरोधात कोणतीही तक्रार असेल, तर त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा.
दरम्यान, पोलिसी तपासात गाडेच्या एका ओळखीचा व्यक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस दलात कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्याचाच गणवेश परिधान करून गाडेने छायाचित्रे काढली होती, असा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या संदर्भात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून, त्यावर तपास सुरू आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तपास यंत्रणा आरोपीविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
याप्रकरणात आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.