मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे. विशेषतः रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी इच्छुक आहेत.
अशातच शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत वातावरण अधिक तापवले आहे. त्यांनी “सुनील तटकरे म्हणजे औरंगजेब” अशी तुलना करत, “ते सुतारवाडीत वास्तव्य करतात आणि आमच्या आमदारांमुळेच ते खासदार झाले आहेत,” असे परखड वक्तव्य केले.
महायुतीतील अंतर्गत वाद अधिकच चिघळत असल्याचे या प्रकारावरून दिसून येते. शिंदे गटाच्या आमदारानेच थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची तुलना औरंगजेबाशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात बोलताना महेंद्र थोरवे म्हणाले, “राजकारणात क्षणिक सुख मिळेल, पण त्याचे भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतात.”
त्यांनी ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाच्या संदर्भाने सुनील तटकरे यांना लक्ष्य केले. आता या टीकेला सुनील तटकरे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रायगडचे पालकमंत्री पद अदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाने या निर्णयाला तीव्र विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही नियुक्तींना स्थगिती दिली. त्यामुळे रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद अद्याप रिक्त आहे.
या दोन पदांवरून महायुतीत सुरू असलेली रस्सीखेच आता उघड राजकीय संघर्षाच्या वळणावर जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महायुतीतील अंतर्गत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.