मराठवाड्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत असून, त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने घटत आहे. प्रचंड उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे, तर ग्रामीण भागातील विहिरी आटू लागल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहराला १५ दिवस पुरेल इतके पाणी उन्हामुळे एका दिवसातच बाष्पीभवन होते. जायकवाडी धरणातून दररोज १.८० दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, आणि हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चांगल्या पावसामुळे जायकवाडीत यंदा मार्च महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उपयुक्त पाणीसाठा आहे—गेल्या वर्षी २५ टक्के असलेल्या पाणीसाठ्याची पातळी यंदा ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, तरीही पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे.
भूजल पातळी खालावली
मराठवाड्यात विंधन विहिरींमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा सुरू असल्याने भूजल पातळी कमालीची खालावली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीचा मोठा उणिवा जाणवत आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील भूजल पातळी सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०२४ च्या जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. मात्र, उन्हाळ्यातील मोठ्या पाणीवापरामुळे मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर या भागात भूजल पातळी प्रचंड खाली गेली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. गोदावरी नदीचे नाभीस्थान असलेल्या नांदेडमध्ये विष्णुपुरी धरण असले, तरी लोकसंख्येच्या तुलनेत पाणीसाठा कमी पडत आहे.
धरणांतील पाणीसाठ्याची घट
मराठवाड्यातील धरणांमधील जलसाठा कमी होत असून, मार्च महिन्यातील उष्णतेमुळे जलसाठ्यात ९ टक्के घट झाल्याचे नोंदवले गेले आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असते, शिवाय बाष्पीभवनामुळेही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे.
सध्याच्या स्थितीत:
• येलदरी धरणात सर्वाधिक ६२४.७६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.
• माजलगाव धरणात १३६.७० दलघमी पाणीसाठा आहे.
• शिवणी धरणात सर्वात कमी म्हणजे केवळ ४.७६ टक्के पाणी शिल्लक आहे.
• विष्णुपुरी धरणात ३१.७२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे, पण तो नांदेडकरांना पावसाळ्यापर्यंत पुरेल, असे वाटत नाही.
राज्यातील लघूप्रकल्पांची संख्या सर्वाधिक मराठवाड्यात असूनही, येथे उपयुक्त जलसाठ्याची टक्केवारी सर्वात कमी आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यावर जलसंकट अधिक गडद आहे.
पाणीबचतीसाठी जनजागृती आवश्यक
येत्या दोन-तीन महिन्यांत उन्हाळ्याचा तीव्र प्रभाव राहणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील नळांच्या गळतीची तपासणी करून ती दुरुस्त करावी. ‘थेंबेथेंबे तळे साचे’ ही म्हण लक्षात ठेवून पाण्याचा एक-एक थेंब वाचविणे गरजेचे आहे.
शाळांचे वेळापत्रक बदला – पालकांची मागणी
सध्या तीव्र उन्हामुळे मराठवाड्यातील शाळांमध्ये दुपारच्या सत्रात विद्यार्थी त्रस्त होत आहेत. त्यामुळे शाळांचे सत्र सकाळीच घ्यावे, अशी मागणी पालक वर्गातून पुढे येत आहे. होळीनंतर तापमान आणखी वाढणार असल्याने विद्यार्थ्यांचे हाल टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
(लेखक डॉ. अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)