X : @vivekbhavsar
लाहोरच्या गजबजलेल्या रस्त्यांमध्ये, जिथे शतकानुशतके जपलेली परंपरा आधुनिक जगाच्या आकांक्षांसोबत मिसळते, तिथे एक शांत पण प्रभावी क्रांती घडत आहे. क्युलिनरी अँड हॉटेल इन्स्टिट्यूट ऑफ पाकिस्तानच्या स्वयंपाकघरात ट्रान्सजेंडर व्यक्ती भाज्या चिरत आहेत, सॉस शिजवत आहेत आणि फाईन डायनिंगचे बारकावे आत्मसात करत आहेत. त्यांच्या दृष्टीने हे केवळ स्वयंपाकाचे प्रशिक्षण नाही, तर एक नव्या आयुष्याची संधी आहे.
या संस्थेने जानेवारी २०२५ मध्ये ट्रान्सजेंडर समुदायासाठी सहा महिन्यांचे पाककला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. या उपक्रमाद्वारे या विद्यार्थ्यांना केवळ व्यावसायिक कौशल्येच नाही, तर रोजगाराच्या संधी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सन्मान मिळतो आहे. पाकिस्तानातील ट्रान्सजेंडर समुदायाला दशकानुदशके सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला आहे. बहुतेकांना नाईलाजाने नृत्य, भीक मागणे किंवा लैंगिक व्यवसायाकडे वळावे लागले, कारण त्यांच्यासाठी अन्य कुठलाही मार्ग नव्हता. मात्र, आता हातात शेफचा सुरी आणि नव्या स्वप्नांची जिद्द घेऊन, ते स्वतःचे भविष्य घडवण्यास तयार आहेत.

नेहा मलिक, ३१ वर्षीय ट्रान्सजेंडर महिला, ही त्यापैकी एक. या प्रशिक्षणात दाखल होण्यापूर्वी ती खाजगी कार्यक्रमांमध्ये नृत्य करून उदरनिर्वाह करत असे. पण आता तिला पाककलेची गोडी लागली आहे. “मला इतकं शिकायचं आहे की आता नृत्य करण्यासाठी वेळच नाही,” ती आनंदाने सांगते. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी, नेहा आता एक नवीन स्वप्न पाहते— दुबईमध्ये शेफ म्हणून काम मिळवण्याचे आणि चांगले आयुष्य उभारण्याचे.
या उपक्रमाची सुरुवात जानेवारीमध्ये २५ विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटाने झाली, तर फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या गटाचा प्रवेश झाला. आतापर्यंत ५० ट्रान्सजेंडर व्यक्तींनी या प्रशिक्षणात प्रवेश घेतला आहे, जे पाकिस्तानच्या वाढत्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने शिकत आहेत. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि दरमहा ८,००० पाकिस्तानी रुपये ($२६) मानधन दिले जाते, जे त्यांचे प्राथमिक खर्च भागवण्यास मदत करते. मात्र, संस्थेसमोर आर्थिक आव्हाने मोठी आहेत आणि या उपक्रमाला दीर्घकाळ चालू ठेवण्यासाठी निधी मिळवण्याचे आव्हान आहे.

शिकवणीपलीकडे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी तयार करण्यात येत आहे. संस्थेकडून स्थानिक हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये नोकरीसाठी संधी निर्माण केल्या जात आहेत. याशिवाय, काही विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी व्हिसा मिळवण्याची मदतही केली जात आहे.
हा उपक्रम पाकिस्तानमधील ट्रान्सजेंडर सशक्तीकरणाच्या व्यापक चळवळीचा एक भाग आहे. गेल्या काही वर्षांत समर्थन हॉटलाइन, ट्रान्सजेंडर-फ्रेंडली राईड-शेअरिंग सेवा, आणि विशेष सुरक्षित ठिकाणे निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. कायद्याच्या पातळीवर पाकिस्तानने दक्षिण आशियातील पहिल्या देशांपैकी एक म्हणून ‘तिसऱ्या लिंगाची’ अधिकृत मान्यता दिली आहे, पण प्रत्यक्षात समाजात अजूनही मोठा भेदभाव पाहायला मिळतो.

तरीही, बदल घडतो आहे. या पाककला प्रशिक्षण उपक्रमासारख्या योजना पाकिस्तानला अधिक समावेशक करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. पाककलेसारखा एक विषय, जो पाकिस्तानच्या संस्कृती आणि ओळखीशी घट्ट जोडलेला आहे, याचाच आधार घेत ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या जीवनात बदल घडतो आहे.
नेहा आणि तिच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी संदेश स्पष्ट आहे—ते केवळ जेवण बनवत नाहीत, तर ते आपल्या भविष्यासाठी स्वाभिमान, संधी, आणि आशा तयार करत आहेत.
(मूळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद)