मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या नव्या पुस्तकावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरूनच अनेकांनी तिरकस प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी सोशल मीडियावर उपहासात्मक शुभेच्छा देत पुस्तकाची मजेशीर टीका केली आहे.
गुरु आशिष पत्रावाला उर्फ अवधूत वाघ यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे राऊत यांच्या पुस्तकाला अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या. “अभिनंदन संजयजी, अभिनंदन तुमच्या पुस्तकासाठी नाही, पण त्याच्या ‘नरकातील स्वर्ग’ या नावासाठी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली.
ते पुढे म्हणतात की, “संजय राऊत यांनी १०० दिवस ‘नरकात’ असल्याचं कबूल केलं, यासाठी विशेष अभिनंदन करावं लागेल.” त्यांनी याच मुद्द्यावर गुगलवर शोध घेतल्याचा उल्लेख करत “वाईट कर्मामुळेच नरकात जावं लागतं असं धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलं आहे” असंही टोल्याने नमूद केलं.
पुढे ते लिहितात की, “राऊत यांच्या पुस्तकाची प्रत त्यांनी शरद पवार यांना दिली हे योग्यच ठरलं, कारण त्यामुळे पवारांना नरकाचं स्वरूप कळालं असावं. त्यानंतरच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा माध्यमांत रंगली होती. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही.”
संजय राऊत यांच्या पुस्तकावरून ‘स्वप्नातील नरक’ किंवा ‘स्वर्गातील नरक’ यासारख्या सिक्वेल्सची अपेक्षा व्यक्त करत, लेखकाने पुस्तकाशी संबंधित राजकीय पटलावर उपहासात्मक भाष्य केलं आहे. याशिवाय तुरुंगातील परिस्थितीचा उल्लेख करत, तुरुंगातील आरोग्यविषयक त्रास आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही भाजप, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची ‘राजकीय मळमळ’ कायम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
“या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या सर्व व्याधी मुळासकट बऱ्या होवोत,” अशा विनोदी शैलीतील शेवटाने पोस्ट पूर्ण होते.
हा प्रकार राजकीय टीकेचा भाग असला तरी संजय राऊत यांच्या पुस्तकाने राजकीय चर्चांमध्ये चांगलाच रंग भरला आहे, हे निश्चित.