नागपूर : नागपूरमधील एक महिला नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुनीता जामगडे (वय 43) असे या महिलेचे नाव असून ती नागपूरच्या संत कबीरनगर परिसरात वास्तव्यास होती.
यासंदर्भातील माहितीनुसार सुनीता जामगडे 14 मे रोजी आपल्या 12 वर्षीय मुलासह काश्मीरला गेली होती. त्यानंतर ती कारगील सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमान येथे पोहचली. याठिकाणी आपल्या मुलाला सोडून निघून गेली. त्यानंतर स्थानिकांनी त्यांच्या मुलाला पोलिसांकडे सोपवले. सुनीता सध्या बेपत्ता असून तिला पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात काही स्थानिक नागरिकांनी तिला पाहिलं आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सुनीताची पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत ऑनलाइन ओळख झाली होती. सुनीता त्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती.
यापूर्वी तिने अमृतसरच्या अटारी बॉर्डरवरून 2 वेळा पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिला रोखून परत पाठवले होते. मात्र, यावेळी ती थेट कारगिलमधून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली. सुनीताची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर नसल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी ती नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात उपचार घेत होती. काही काळ ती एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती.
सुनीताची आई निर्मला जामगडे यांनी सांगितले की, मुलाला कपडे घेऊन येतो, म्हणून सुनीता घरातून बाहेर गेली. सध्या सुनीताचा मुलगा काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यात असून सुनीताबाबत नागपूरच्या कपिलनगर पोलिसांकडून विचारणा करण्यात आली आहे.