मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचे केले कौतुक
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकून इतिहास रचला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने एकमताने संमत केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आठ महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय संघाने विश्वविजेतेपद पटकावले आहे. भारत आज क्रिकेट जगताचे नेतृत्व करीत आहे.” कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलेली ही विजयाची भेट आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अभिनंदन प्रस्ताव संमत झाल्यानंतर त्याची प्रत विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला पाठवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.