X: @ajaaysaroj
मुंबई: महायुतीमध्ये पालघरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत (Palghar Lok Sabha election) उतरणार असल्याचे जाहीर करून एक वेगळीच चाल खेळली आहे. मात्र त्यांच्या या पवित्र्यामागे राज्य भाजपचा एक नेता असल्याचे बोलले जात असून महाआघाडीचे धाबे दणाणले आहेत.
पालघर मतदारसंघात कामे व्हावीत या एकमेव उद्देशाने बविआ (BVA) नेहमी सत्ताधारी पक्षाला पाठिंब्या देण्याचे राजकारण करत आली आहे. त्यामुळे आता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, अशी बविआची भावना आहे. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचा मतदारसंघांवरील जबरदस्त पगडा लक्षात घेता त्यांच्या या घोषणेने कदाचित वेगळी गणितं बघायला मिळतील. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) इथून उबाठा गटाच्या भारतीताई कामडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या स्वतः पालघरच्या जिल्हा परिषदेच्या (Palghar Zilla Parishad) अध्यक्षा राहिल्या आहेत.
या मतदारसंघात २०१९ च्या निवडणूकीपूरताच शिवसेनेत (Shiv Sena) आलेले राजेंद्र गावित विद्यमान खासदार (MP Rajendra Gavit) आहेत. भाजपचे निष्ठावंत आणि अत्यतं ज्येष्ठ माजी खासदार चिंतामण वनगा यांचे दुर्दैवाने २०१८ मध्ये निधन झाले. पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा चिंतामण वनगा याला तिकीट नाकारून भाजपने (BJP) राजेंद्र गावित या बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली.
२०१९ मध्ये लोकसभेची मध्यवर्ती निवडणूक जाहीर झाली आणि ही जागा शिवसेनेकडे गेल्यावर गावितांनी सरड्या प्रमाणे रंग बदलत शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. आता पुन्हा एकदा सत्तेचा मुकुट स्वतःच्याच डोक्यावर ठेवण्यासाठी गावित परत रंग बदलतील आणि भाजपच्या वळचणीला जातील अशी खात्री प्रत्येकाला आहे. पण या कोलांटउड्यांमुळे भाजपचे राज्यातील काही नेते, तसेच पालघर मधील भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे कळते.
शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्याने ही जागा आमचीच असा दावा जरी शिवसेनेने ठोकला तरी २००९ पासून भाजप येथे निवडणूक लढत आला आहे. त्यामुळे असेही बोलले जात आहे की ही जागा परंपरागत भाजपची आहे. येथे असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात तब्बल तीन आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत. डहाणूमध्ये विनोद निकोले सी पी एमचे (CPIM), विक्रमगडमध्ये सुनील भुसारा राष्ट्रवादीचे (NCP), पालघरमध्ये श्रीनिवास वनगा शिवसेनेचे, तर बोईसरमध्ये राजेश पाटील बविआ, नालासोपारा मध्ये क्षितिज ठाकूर बविआ आणि वसईत खुद्द हितेंद्रआप्पा ठाकूर बविआचे असे तीन आमदार बविआकडे आहेत.
आजपर्यंत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी तीन लाखांच्या घरात मतं मिळवली आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर बळीराम जाधव यांनी थेट ४,९१,५९६ अशी तब्बल ४७ टक्के मतं मिळवली आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःच आता या मतदारसंघात उमेदवार उभा करायचा असा निर्णय घेतला आहे.
आम्ही नेहमीच मतदारसंघात विकासकामे व्हावीत म्हणून सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देत आलोय, यावेळी त्यांनी आम्हाला लोकसभेत पाठिंबा द्यावा असे खुले आवाहन माध्यमांशी बोलताना बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. बविआच्या या निर्णयामागे भाजप मधील राज्यातील एक धुरंधर नेता असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्यावतीने ही जागा सोडायची नाही असा सातत्याने दबाव येत असल्याने या नेत्यानेच ही जागा बविआसाठी सोडता येईल का अशी चाचपणी सुरू केली आहे असे बोलले जाते.
महाफुटीनंतर शिवसेनेच्या (split in Shiv Sena) येथील मतांमध्ये फूट होणार हे निश्चित आहे. गावितांना येथून ५,१५,००० मते २०१९ मध्ये मिळाली होती. ते जेमतेम २३,४०४ मतांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांसमोर कसेबसे निवडून येऊ शकले होते. शिवसेनची मते निश्चित फुटत असताना, बहुजन विकास आघाडीची जवळपास पाच लाख मते कायम राहणार आहेत. त्यामुळे बविआने ही जागा लढवावी आणि आजपर्यंत मिळालेल्या विधानसभेतील पाठिंब्याच्या बदलात महायुतीने सन्मानाने बविआला ही जागा सोडून “अब की बार चारसौ पार” साठी एक खासदार निश्चित करावा अशी स्ट्रॅटेजी भाजपच्या या नेत्याने हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जागा दिली नाही हा ठपकापण भाजपवर नको आणि मित्रपक्ष असलेल्या बविआला एक जागा दिल्याचा मेसेजही राज्यात जातो अशी दुहेरी चाल या चाणाक्ष नेत्याने आखल्याची चर्चा सुरू आहे.
लोकसभा मतदारसंघात तीन आमदार, महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक, जिल्हा परिषदचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य असे अनेक लोकप्रतिनिधी सध्या बहुजन विकास आघाडीकडे पालघरमध्ये आहेत. बोईसरचे विद्यमान आमदार राजेश रघुनाथ पाटील, माजी महापौर राजीव यशवंत पाटील, हितेंद्र अप्पांचे विश्वासू अजीव पाटील, अनुभवी बळीराम जाधव आणि नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर अशी काही नावे सध्या लोकसभेच्या उमेदवारी साठी चर्चेत आहेत.
महायुती ही जागा बविआसाठी सोडते का, शिवसेना आपला हक्क सोडेल का, भाजप नेत्याची ही खरोखरची खेळी आहे की, भाजपलाच ही जागा लढवायची आहे, की नेहमीसारखीच राजकीय वर्तुळात उठलेली निव्वळ एक चर्चा आहे हे काही दिवसांत स्पष्ट होईल.