मुंबई : “इंग्रजीत कामकाजपत्रिका हवी, असा आग्रह धरला जात असेल, तर अशा सदस्यांना थेट ब्रिटनच्या संसदेतच पाठवा,” अशी टोलेबाजी ज्येष्ठ भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. ते औचित्याच्या मुद्द्यावर बोलत होते.
मुनगंटीवार म्हणाले, “एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषा घोषित करण्याची मागणी करतो आणि दुसरीकडे काही सदस्यांना मराठीत विचार मांडता येत नाही. त्यांच्यासाठी हिंदीचा पर्याय उपलब्ध आहे. मग कामकाजपत्रिका इंग्रजीतून का? जर मराठी समजत नसेल तर ती हिंदीतून द्या, इंग्रजीत देण्याची गरज काय?”
ते पुढे म्हणाले, “हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन, हे पूर्णपणे चुकीचे आहे. महाराष्ट्र विधानसभेचे नियम स्पष्टपणे सांगतात की, सभागृहाचे कामकाज मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत चालवता येते. मात्र, आजवर या सभागृहात कामकाजपत्रिका इंग्रजीतून दिल्याचे उदाहरण नाही. इंग्रजीचा प्रभाव तेव्हा असू शकतो, जेव्हा नियमावली तयार झाली; पण आता काळ बदलला आहे. नियम समितीची बैठक बोलवून इंग्रजी शब्द काढून टाकावेत.”
मुनगंटीवारांनी स्पष्टपणे मत मांडले की, “मराठी शिकणे अनिवार्य असावे, आणि अत्यंत अडचण असेलच, तर हिंदी शिका; पण इंग्रजीतून कामकाजपत्रिका मिळणे म्हणजे राज्यभाषेचा अवमान आहे.”
या मुद्द्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली की, नऊ आमदारांनी इंग्रजीत कामकाजपत्रिका मिळावी, अशी विनंती केली आहे.