मुंबई: इफकोने बेकायदेशीर आणि अवास्तव दराने विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी इफकोची खते अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत, असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच, नॅनो खतांसाठी निश्चित अधिकृत दरपत्रक पुन्हा जाहीर करण्यात आले आहे.
इफकोच्या नॅनो खतांची विक्री प्राधिकृत विक्रेत्यांद्वारेच करण्याचे निर्देश असतानाही काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म बेकायदेशीररीत्या ही खते विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्लॅटफॉर्म इफकोने अधिकृत न केलेल्या स्रोतांकडून अत्यल्प साठा खरेदी करून तो अधिकृत दरापेक्षा कमी किंमतीत विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची व अधिकृत विक्रेत्यांची दिशाभूल होत आहे.
इफकोने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेश (FCO) अंतर्गत केवळ अधिकृत प्रमाणपत्रधारक विक्रेत्यांनाच ही खते विक्री करण्याची परवानगी आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म ही खते अनधिकृतपणे विकत असून, त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
इफको नॅनो खतांचे अधिकृत दर (जीएसटीसहित)
नॅनो युरिया:
• विक्रेत्यास विक्री दर – ₹204 प्रति 500 मि.ली. बाटली
• शेतकऱ्यांसाठी कमाल विक्री दर – ₹225 प्रति 500 मि.ली. बाटली
नॅनो डीएपी:
• विक्रेत्यास विक्री दर – ₹547.50 प्रति 500 मि.ली. बाटली
• शेतकऱ्यांसाठी कमाल विक्री दर – ₹600 प्रति 500 मि.ली. बाटली
इफकोच्या नॅनो खतांचे हे दर संपूर्ण भारतभर समान आहेत.
इफकोने यापूर्वीही आपल्या खतांच्या अधिकृत दरांबाबत जाहीर स्पष्टीकरण दिले होते. मात्र, शेतकऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये म्हणून हे दर पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहेत.
जर कोणीही हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यावर इफको कडक कारवाई करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करून गुणवत्तेची खात्री करावी, असे आवाहन इफकोच्या वतीने करण्यात आले आहे.