कारवाई कुणावर करायची? महसूल यंत्रणा संभ्रमात
जिल्हा खनिकर्म विभागाने डोळ्यावर काळी पट्टी बांधल्याचा आरोप
महाड: महाडजवळील सावित्री नदीपात्रालगत केभुर्ली येथे उभारण्यात येत असलेल्या एम-SAND प्रकल्पाच्या परिसरात अनधिकृत वाळूसाठा आढळून आल्याने महाड तलाठ्यांनी तो जप्त केला आहे. मात्र हा अनधिकृत उत्खनन नेमके कोणी केले, याबाबत महसूल यंत्रणेकडे कोणतेही ठोस उत्तर नसल्याने कारवाई कोणावर करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा खनिकर्म विभागाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
केभुर्ली येथे सावित्री नदीपात्रालगत उभारण्यात येत असलेल्या एम-SAND प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे प्रदूषण होणार असून त्यामुळे लहान मुले व वृद्ध नागरिकांना श्वसनविकार, तसेच आवाजामुळे श्रवणदोष होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. मात्र ग्रामपंचायतीचा विरोध आणि ना-हरकत प्रमाणपत्र नाकारले असतानाही तहसील व मंडळ अधिकाऱ्यांच्या मौन संमतीने युनिट उभारले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
महाड तहसील कार्यालयाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या लेखी उत्तरात या एम-SAND/क्रेशर प्रकल्पाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना, अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या या प्रकल्पावर कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
केभुर्ली गावातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अब्दुल रहमान अब्दुल हलीम घोले यांनी २७ ऑक्टोबर रोजी महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे लेखी निवेदन देत पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच ग्रामपंचायत सदस्य जाकीर अब्दुल रहमान घोले यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतही निवासी नायब तहसीलदारांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सावित्री नदीपात्रात मध्यरात्री पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असून, ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
दोन ठिकाणी प्रत्येकी ७०-७० ब्रास अनधिकृत वाळू साठा आढळला
महाड तलाठ्यांच्या तपासणीत –
• सर्वे नं. 63/8 (मालक: अकबर अहमद सत्तार ताज, क्षेत्र 0.38.80) येथे अंदाजे 70 ब्रास,
• सर्वे नं. 16/5 (मालक: फातिमा बेबी मोहम्मद अली घोले, क्षेत्र 0.95.60) येथे अंदाजे 70 ब्रास
इतका सावित्री नदीपात्रातून उत्खनन केलेला अनधिकृत रेजगा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.
तरीही उत्खनन करणारे नेमके कोण, याबाबत महसूल यंत्रणा मौन बाळगत आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी निष्क्रिय असल्याने सावित्री खाडीपात्रात दररोज रात्री ‘वाळूचा खेळ’ खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणात आता तहसीलदार कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

