मुंबई – इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोन वेळा वेतनवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले, “विमानतळांवरील विविध कंपन्यांमधील कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. मात्र, त्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले होते. इंडिगो एअरलाईन्समधील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्या भाजपकडे मांडल्यानंतर आम्ही त्या लढ्याची जबाबदारी घेतली आणि सातत्याने व्यवस्थापनाशी चर्चा केली.”
कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मागील काही महिन्यांपासून सलग बैठका घेऊन हा तोडगा काढण्यात आला, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त होत्या. त्यांच्या हिताचा विचार करत कंपनीने वर्षातून दोनदा वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला असून याचा थेट फायदा देशभरातील 26 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.”
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवरील गेल्या काही वर्षांपासून चालू असलेला अन्याय संपुष्टात आला असून, कामगार वर्गाच्या संघर्षास यश लाभल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने नेहमीच कामगारहिताला प्राधान्य दिले आहे. कोणत्याही कामगारावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घेतली जाते.”
भविष्यातही कामगारांच्या वेतनासोबतच अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत व्यवस्थापन समितीशी चर्चेचे दरवाजे खुले राहतील, असे आश्वासनही रविंद्र चव्हाण यांनी दिले.
या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, इंडिगो एअरलाईन्स कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष करण कांबळे, सचिव दिनेश शेवाळे, तसेच चंदन कडू, सिराज हाशमी, शैलेश पवार, देवेंद्र पोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.