मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सरकार शक्तीपीठ महामार्गाचा आभास निर्माण करत आहे, असा आरोप करत या महामार्गावर अपेक्षित टोल मिळाला नसल्याचे दाखवून दिले. ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा महामार्ग उभारला तरी टोल वसूल होण्यासाठी किमान २८ वर्षे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याऐवजी नागपूर-गोवा महामार्गावरील सर्व शक्तीपीठांच्या विकासासाठी प्रत्येकी ५-५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यामुळे शक्तीपीठांना येणाऱ्या भक्तांसाठी सुविधा निर्माण होतील आणि तीर्थक्षेत्रांचा विकास साधला जाईल, असे त्यांनी सुचवले.
“शक्तीपीठ महामार्गाच्या अट्टहासाखातर राज्यातील २७ हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकले जात आहे,” असे सांगत त्यांनी महामार्ग रद्द करण्याचा वटहुकूम असतानाही तो पुन्हा राबवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला.
राज्यभरातील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असतानाही राज्यपालांच्या अभिभाषणात हा विषय समाविष्ट करण्यात आल्याबद्दल त्यांनी दुर्दैव व्यक्त केले आणि याविषयी खेदही व्यक्त केला.