By: राजन चव्हाण
रत्नागिरी: उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांना पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून संजय कदम शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिला नसला तरीही त्यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित असल्याचे मानले जात आहे.
ठाकरे गटात राहून पक्षाविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असून, त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.