मुंबई: विनोदी कलाकार कुणाल काम्राने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्यावर केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे. काम्राने विनोदाच्या नावाखाली या प्रतिष्ठित व्यक्तींवर अशोभनीय टीका केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
युवासेनेचे नेते अमेय घोले यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत ट्विट केले की, “ही विनोदाच्या नावाखाली खालच्या पातळीवर जाऊन केलेली घृणास्पद टीका आहे. समाजात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींवर अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य करणे माफ करण्याजोगे नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे काही लोक या वर्तनाचे समर्थन करत आहेत.”
युवासेनेने या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत कुणाल काम्राच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. “आम्ही लवकरच आंदोलन छेडणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व स्टुडिओ आणि कार्यक्रम आयोजकांना आवाहन करतो की, कुणाल काम्राचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत,” असे युवासेनेने स्पष्ट केले आहे.