महाराष्ट्र ताज्या बातम्या

कुणाल कामरा प्रकरणावरून विधानभवनात शिंदे गटाचे आंदोलन

मुंबई – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. “कुणाल कामरा माफी माग” आणि “शिंदे साहेबांचा अपमान खपवून घेणार नाही” अशा घोषणा देत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे, हे जनतेने आधीच दाखवून दिले आहे. त्यामुळे कुणाल कामराने अशा प्रकारे कोणाचा अनादर करण्याचा प्रयत्न करू नये. संविधानानेही स्पष्ट केले आहे की, स्वातंत्र्याचा गैरवापर करता येणार नाही. त्यामुळे कुणाल कामराने माफी मागितलीच पाहिजे.”

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “स्टँडअप कॉमेडी करणे वेगळे आणि एखाद्याचा अपमान करणे वेगळे. व्यंग करण्याचा अधिकार आहे, पण जाणूनबुजून बदनामी करणे सहन केले जाणार नाही. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.”

त्यांनी कामराच्या संविधानाच्या उल्लेखावरही टीका करताना म्हटले, “हे लाल संविधान राहुल गांधी सुद्धा दाखवतात, पण ते कामराने वाचलेले नाही.”

शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा

या वादानंतर शिंदे गटाचे आमदार अधिक आक्रमक झाले. आमदार मुरजी पटेल यांनी यापूर्वीच कुणाल कामराविरोधात एफआयआर दाखल केला असून, त्याला दोन दिवसांत माफी मागण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी कामराच्या अटकेचीही मागणी केली.

वादाची पार्श्वभूमी

कुणाल कामराने आपल्या ‘नया भारत’ या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या २०२२ मधील बंडखोरीवर विडंबनात्मक गाणे सादर केले होते. ‘दिल तो पागल है’ या गाण्याच्या चालीवर “गद्दार वो नजर आए” असे म्हणत त्याने शिंदे यांना लक्ष्य केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंधेरीतील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओवर हल्ला चढवत तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या तोडफोडीचा निषेध करत कामराच्या गाण्याला पाठिंबा दिला आहे. तर, शिंदे गटाने हे वक्तव्य बदनामीचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, कुणाल कामराने संविधानाचा फोटो पोस्ट करत “पुढे जाण्याचा एकमेव मार्ग” असे कॅप्शन दिले आहे, मात्र त्याने या वादावर थेट भाष्य केलेले नाही. शिंदे गटाच्या आक्रमक आंदोलनामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असून, पोलिसांनी कामराविरोधात दाखल केलेल्या एफआयआरबाबत कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात