महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिवाळखोरीकडे नेणारा…!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रखर टीका…

X: @therajkaran

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब,सामान्य जनता,शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार युवा पिढी,मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचा सरकारचा हा संकल्प अशा शब्दात हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्पावरील सर्वासाधारण चर्चेवेळी बोलताना केला.

वडेट्टावार म्हणाले की,अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीची तरतूद केली.निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारी पैशातून मतं मिळविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे.सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी ही सरकारची युक्ती आहे. राज्यात दु:शासनाच्या औलादी मोकाट फिरतायत.राज्यातील महिला सुरक्षित नाहीत.त्यामुळे त्यांना साड्यांऐवजी सरकारने शस्र वाटावीत.किमान त्या स्वत:चे संरक्षण करतील.कारण सरकार महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस पत्नींचा जाहीर अपमान करतात वर आमचा बाप सागर बंगल्यात बसलाय आमच कोणी वाकड करू शकणार नाही,अशी भाषा वापरतात.हाच महिलांचा सन्मान आहे का असाही संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले की,अर्थव्यवस्थेचे आकारमान एक ट्रीलीयन डॉलर करणार आहे.एक ट्रीलीयन डॉलर शब्द म्हणजे फुगवलेला आकडा आहे. अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढवायचे असेल तर महसूल आणणार कुठून. कारण राज्यात उद्योग राहिले नाहीत.यासंदर्भात तज्ज्ञांचा अहवालही झोप उडवणारा आहे.तरी तुम्ही ट्रीलीयनची भाषा करता.तुमचा हा आकड्यांचा खेळ राज्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देताना,राज्यात कोणी गुंतवणूक करत नाही,रोजगार नाही,उत्पादन नाही. राज्याची पूर्ण पिछेहाट झाली आहे. मागच्या बजेटमध्ये खूप घोषणा केल्या. या घोषणांच्या अंमलबजाणीसंदर्भात आम्ही ५६ पत्रे दिली.परंतु फक्त एकाच सचिवांनी उत्तर दिलं.मागच्या घोषणांची कुठेही अंमलबजावणी नाही.केवळ पोकळ घोषणा करून तुम्ही करून शिळ्या कढीला ऊत आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अर्थसंकल्पात स्मारकाच्या घोषणा केल्या.एवढ्या सगळ्या स्मारकांना पैसा दिला.पण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे काय केले याचा उल्लेख केला नाही.या दोन्ही स्मारकाकडे तुमचे अक्षम्य दुर्लक्ष आहेच.पुणे येथील महात्मा फुले स्मारकाला किती निधीची तरतूद केली हे तुम्ही सांगितले पाहिजे.पायभूत सुविधांचे प्रकल्प उभारताना मर्जीतल्या कंपन्यांना कामे दिली जातात. प्रकल्पाच्या किंमती फुगवल्या जातात. चौकशीचा ससेमिरा अधिकाऱ्यांच्या मागे लावून हवी तशी कामे करून घेतली जातात. या कामांमुळे सरकारी तिजोरीवर किती बोजा येणार याचा उल्लेख तुम्ही का करत नाही,असेही खडे बोल त्यांनी सरकारला सुनावले.

दाओसमध्ये ३ लाख कोटींचे करार केले.मात्र गेल्या वर्षी दाओसमध्ये केलेल्या करारांचे काय झाले.गुंतवणुक कुठे गेली.रोजगार निर्मिती झाली कि नाही.किती लोकांना रोजगार मिळाला. याची आकडेवारी सादर करा.मग वस्तुस्थिती समोर येईल.१ लाख कोटींची गुंतवणूक आणि २० हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० विशाल प्रकल्पांना प्रणेता उद्योगाचा दर्जा दिला. पण तुमच्या सत्तेच्या गेल्या दहा वर्षात २ लाख रोजगार देखील निर्माण झाले नाहीत.ही वस्तुस्थिती असली तरी आमचा उद्योग आणि विकासाला पाठींबा आहेच.पण प्रणेता उद्योगाचे धोरण सांगताना नवीन किती उद्योग आले.उद्योगाचे किती नवीन पार्क तयार झाले हे तुम्ही सांगितले पाहिजे.केवळ सिलेक्टीव्ह उद्योजकांना रेड कार्पेट टाकायचे.कोणतेही नियोजन करायचे नाही.असले तुमचे धोरण म्हणजे नियोजनशून्य कारभाराचे प्रदर्शन असल्याचेही वडेट्टावार यांनी खडसावून सांगितले.

राज्यातील अंगणवाड्यांना तुम्ही 37 हजार सौर उर्जा संच देणार असल्याचे सांगितले.त्यांना तुम्ही मोबाईल देताय. हे सगळं कंत्राटदारांना पैसे मिळण्यासाठी तुम्ही करताय.केवळ यातून मलिदा मिळण्याची सोय केली जातेय.अंगणवाडी सेविकांना मोबाईल आणि उर्जा संच देण्यापेक्षा पगार का वाढवत नाही.याच उत्तर तुम्ही दिलं पाहिजे.आशा वर्करचा पगार सात हजार रूपये पगार वाढवण्याची आम्ही मागणी केली तर दादा तुम्ही म्हणता त्यांनी दोन पावले मागे आले पाहिजे. अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवताना तुम्ही हात अखडता घेता.पण कंत्राटदारांसाठी मोबाईल आणि सौर उर्जा संचाची खरेदी मात्र सढळ हाताने, वाढीव दराने करता.हे तुमच्या कोणत्या तत्वात बसतं याचा खुलासा करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मदत आणि पुनर्वसन विभागाला केवळ ६६८ कोटी रूपयांची तुम्ही तरतूद केली. पण त्यात काय होणार आहे या तुटपुंज्या तरतूदीनं.परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले असेल.हे पैसे तुमचे कुठे पुरणार आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली.

वडेट्टावार म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प वाचल्यानंतर शिस्त लावण्याऐवजी आर्थिक स्थिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचेच दिसून येते.राज्याची अंदाजित महसूली तूट सन २०२४-२५ मध्ये ९ हजार ७३३ कोटी दाखवण्यात आली आहे.राज्याची अंदाजित राजकोषीय तूट सन २०२४-२५ मध्ये ९९ हजार २८८ कोटी दाखवण्यात आली आहे. त्यामूळे जुलै मध्ये जेव्हा तुम्ही अर्थसंकल्प मांडाल त्यावेळी यामध्ये सुमारे 1 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली दिसेल.अंतरिम अर्थसंकल्पात तुम्ही कर्ज कमी दाखवलेले आहे.याचा अर्थ,राज्यावरचा कर्जाचा बोजा कमी करण्यात तुम्हाला यश आलेले नाही. यावरून हे राज्य दिवाळखोरीकडे निघाल्याचे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानात घट आहे.कर उत्पन्नात पाहिजे तशी वाढ दिसत नाही.मग या ज्या काही घोषणा तुम्ही केल्या,त्यासाठी पैसा कुठुन आणणार,हा आमचा प्रश्न आहे.केवळ घोषणाच असल्यामुळे आणि निधी नसल्यामुळे तुमचा अर्थसंकल्प हा “निवडणुक जुमला” ठरणार, अशाप्रकारची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली असून आर्थिक शिस्तीला हरताळ फासले आहे.सरकारचे आर्थिक नियोजन कोसळण्यामागे राजकीय कारण असल्याची टिका करत, ‘जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा । ‘मेजाखालून,मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥ या कुसुमाग्रजांच्या ओळीतून वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले.

Also Read: विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात