उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्या ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची स्थापना
X: @therajkaran
मुंबई: देशात लोकांचं भलं करणारे समाजवादी विरुद्ध लोकांना बरबाद करणारे माजवादी अशी लढाई सुरू आहे. आपण समाजवादाच्या बाजूने लढणार आहोत. हुकूमशाही गाडण्याची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी आपल्यावर सोपवलेली आहे. महाराष्ट्र हुकूमशाहीचं थडगं बांधेल. ही लढाई आपण एकजुटीने लढूया. शेतकरी, कामकरी, वंचित, तरुण या सर्वांनी एकत्र येऊन आपण विजयी होऊ, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीमध्ये व्यक्त केला.
आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ च्या स्थापना मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या मैदानावर पार पडलेल्या मेळाव्याला राज्यभरातून समाजवादी जनता परिवारातील कार्यकर्ते, जनसंघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील भाषणात म्हणाले की, ते पलटले, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया सोबत आहोत. महाराष्ट्रातला समाजवादी जनता परिवार नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात लढण्यास कटिबद्ध आहे. देश, समाजवाद वाचवण्यासाठी लोकशाही समाजवादी विचारांच्या राजकीय पक्षाचे पुनर्गठण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची पुनर्स्थापना केली आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे कटिबद्ध आहेत. त्यांची या प्रसंगी साथ आहे ही उभारी देणारी गोष्ट आहे. शेती, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट सुरू आहे. मुंबईची लूट सुरू आहे. हे थांबवण्यासाठी समाजवादी गणराज्य पार्टी लढाई लढेल.
माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, अर्थशास्त्रज्ञ डॉ. नीरज हातेकर, आदिवासींचे नेते काळूराम काका धोदडे, बिहारचे युवा नेते प्रतीक पटेल हे मान्यवर मंचावर होते. नितीन वैद्य यांनी ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ च्या नावाची उद्घोषणा केली. अतुल देशमुख यांनी देशातल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर ठराव मांडला. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.