X: @therajkaran
इंडिया आघाडीचा कालचा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घेतला असता तरी चालले असते. एवढा खर्च करण्याची काही आवश्यकता नव्हती. २५ पक्षांनी एकत्र येवुन सुद्धा मैदान भरू शकत नाही, हा प्रकार नैराश्यपूर्ण व वेळकाढूपणा करणारा असून कालचा मेळावा म्हणजे फ्लॉप शो असल्याची सणसणीत टिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना भाषणासाठी फक्तं पाचच मिनिट देण्यांत आली हे अत्यंत दुःखदायक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
उदय सामंत यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, दिवंगत बाळासाहेब ठाकरे जेव्हा याच शिवाजी पार्कवर शिवसेनेची सभा घ्यायचे त्यावेळेस त्यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर गर्दीने ओसंडून जायचा. मात्र कालच्या मेळाव्याला एवढी कमी गर्दी होती की, येथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे काय सुरु आहे, अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह होते. यापेक्षा जास्त गर्दी शिवसेनेच्या किंवा महायुतीच्या तालुक्याच्या सभेमध्ये असते, असाही टोला सामंत यांनी लगावला.
सामंत पुढे म्हणाले, कालच्या मेळाव्यात उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांचे फक्त एकदा नाव उच्चारले. मात्र अन्य पक्षांच्या नेत्यांनी दिवंगत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावाचा उच्चार देखील आपल्या भाषणात केला नाही. अगदी राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेबांचे नाव आपल्या भाषणात घेतले नाही. इंडिया आघाडीच्या नेत्यांचे भाषण सुरु असताना हे भाषण कशासाठी सुरु आहे, त्याचा अर्थ सुद्धा कित्येक कार्यकर्त्यांना उमगत नव्हता. कार्यकर्त्यांचे सोडून द्या पण भाषण करणाऱ्या व्यक्तीला तरी त्या भाषणाचा अर्थ समजला का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, एवढेच या मेळाव्यात सुरु होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या सुरुवातीला आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील जनतेने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीला नाकारले.त्यामुळे आमच्या महायुती सरकारला कोणीही तडीपार करू शकत नाही, हे सिद्ध झाले असून महायुतीचे ४५ पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रात निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.