नागपूर
आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सभागृहात सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह जयंत पाटील यांनीही प्रश्नांची सरबत्ती केली.
गेल्या काही दिवसात राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून देशात भारतात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की काय असं वातावरण आहे. रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं संरक्षण करा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला.
जयंत पाटील पुढे म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. आतापर्यंत आपण बिहार राज्याविषयी बोलत होतो. मात्र आता आपल्या राज्यात अशी स्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे राज्यात ड्रग्सचं जाळं वाढलं असून उडता पंजबा, उडता महाराष्ट्र झालाय.
नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यास गृहमंत्री अपयशी – अंबादास दानवे
मागील ५ वर्षांपासून भाजपची सत्ता असतानाही आजही विदर्भाच्या प्रश्नांवर, विकासावर ठोस व कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर केला नाही. गेले ५ वर्षे विदर्भाचा अनुशेष बाकी का आहे? विदर्भात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. नागपुरमध्ये महिला अत्याचार, खून दरोडे या सारख्या गुन्ह्यात वाढ झाली असून येथील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेकडे वळतेय. नागपूरचे पालकमंत्री हे गृहमंत्री असूनही त्यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यास ते अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.