मुंबई
जितेंद्र आव्हाडांच्या रामाविषयीच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन टीका केली होती. त्यानंतर आज सकाळी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेची धाड पडल्यानंतर शेवटी जितेंद्र आव्हाड मदतीसाठी धावुन आले.
जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवारांची पाठराखण केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचे हे त्याचं फळ आहे.
वाईट याचेच वाटते की, यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल.
बारामती अॅग्रोच्या सहा ठिकाणी छापेमारी
आज सकाळी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अॅग्रोच्या सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने ही छापेमारी केली असून अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. सध्या रोहित पवार यांचे काका अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही ईडीने थेट पवार घराण्यातच हात घातल्याने चर्चांना उधाण आलं आले.
जितेंद्र आव्हाड यांच्या राम मांसाहारी होता या वक्तव्यावरुन रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन निषेध व्यक्त केला होता.
रोहित पवारांनी लिहिलं होतं की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.
देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!