मुंबई : राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येते. या रकमेची भरपाई एस टी महामंडळाला शासनाकडून सरकारी तिजोरीतून केली जाते. त्याच धर्तीवर दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच मुंबई मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.
कैतके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “मेट्रो स्थानकांमध्ये व गाड्यांमध्ये दिव्यांग अनुकूल सुविधा अद्याप पूर्णपणे उपलब्ध नाहीत. अनेक दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना इतरांची मदत घ्यावी लागते. या अडचणींचा विचार करता, दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देणे हे सामाजिक न्यायाचेच नव्हे तर मानवी दायित्वाचेही पाऊल ठरेल.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, राज्य शासनाने महिला प्रवाशांसाठी जसे अनुदान दिले आहे, तसेच मेट्रो प्रशासनालाही शासनाने परतावा स्वरूपात आर्थिक मदत दिल्यास ही सवलत शक्य आहे. दिव्यांगांना सवलत ही त्यांच्या शारीरिक मर्यादांचा आदर राखत “सन्मानपूर्वक मदत” या स्वरूपात दिली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कैतके यांनी निदर्शनास आणून दिले की संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका ठरावानुसार शासनाला त्यांच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांग समूहाच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे अपेक्षित आहे. ते म्हणाले, दिव्यांगसाठी असलेल्या याच निधीतून मेट्रो ला प्रवास सवलतीची भरपाई केल्यास सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार नाही किंवा स्वतंत्र तरतूद करावी लागणार नाही.
दीपक कैतके यांनी दिव्यांगांच्या सुलभ आणि सन्मानपूर्वक प्रवासाच्या हक्कासाठी दीर्घकाळापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या या मागणीला सामाजिक संस्थांकडून आणि नागरिकांकडून मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असून, शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी वाढू लागली आहे.

