ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांचा पत्रकारांना सल्ला
पत्रकारितेतील आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी केवळ नोकरी किंवा लेखनावर अवलंबून न राहता पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांनी दिला. पत्रकारितेतील सुवर्णमहोत्सवी वाटचाल आणि वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा मुंबईत गौरव करण्यात आला.
मुंबई : आजची पत्रकारिता अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच केवळ पत्रकारितेवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधावेत, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांनी दिला. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे डॉ. सुकृत खांडेकर यांच्या पत्रकारितेतील सुवर्णमहोत्सवी वाटचालीबद्दल तसेच वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. खांडेकर यांनी पत्रकारितेतील बदलती परिस्थिती, पत्रकारांसमोरील आर्थिक आव्हाने आणि आरोग्याच्या प्रश्नांवर भाष्य केले. मोठ्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये मोठे वेतन घेणाऱ्या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती तुलनेने चांगली असते. मात्र, इतर अनेक पत्रकारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि आर्थिक स्थैर्य राखणे कठीण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पत्रकारांनी उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करावेत, जोडव्यवसायाचा विचार करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्तांकनातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांसाठी सातत्याने लेखन करीत असल्याचे डॉ. खांडेकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, राही भिडे, योगेश वसंत त्रिवेदी, अभय देशपांडे तसेच वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी डॉ. सुकृत खांडेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा आणि दीर्घ कारकिर्दीचा गौरव केला. संघाचे सरचिटणीस दीपक भातुसे यांनी आभार मानले. डॉ. सुकृत खांडेकर यांचे अनेक जुने सहकारी आणि पत्रकार यावेळी आवर्जून उपस्थित होते.

