१२ चार्टर्डप्लेनच्या “वोट विमानम” मोहिमेमधून केरळी बांधव भारतात
X: @ajaaysaroj
मुंबई: लोकशाहीतला मोठा उत्सव म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी आखाती देशातून तब्बल बारा चार्टर्ड फ्लाईटनी हजारोंच्या संख्येने केरळी बांधव भारतात आले आहेत. उद्या २६ तारखेला होणाऱ्या मतदानात भाग घेता यावा म्हणून आज रात्रीच्या शेवटच्या चार्टर्ड फ्लाईट फेरीपर्यंत हे अनिवासी भारतीय केरळात येणार असून “वोट विमानम” असे या मोहिमेचे नाव ठेवण्यात आले आहे. केरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्र या संस्थेच्या सक्रिय पुढाकाराने हे मतदार केरळात येत आहेत.
केरळमध्ये ८९८३९ नोंदणीकृत अनिवासी मतदार आहेत. यातील बहुतांश मतदार हे आखाती देशात आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, इंडियन युनियन मुस्लिम लीग प्रणित केरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्र आणि प्रियदर्शनी काँग्रेस या तीन प्रमुख संस्थेच्या माध्यमातून “वोट विमानम” ही मोहीम राबविण्यात आली आहे. या तीनही संस्थांनी, ट्रॅव्हल्स संस्थेच्या मदतीने केरळात येणाऱ्या मतदारांना कमीतकमी दरात तिकिटे उपलब्ध करून दिली. ईद आणि विशु या दोन महत्त्वाच्या सणांमुळे आखाती देशांतून येण्यासाठी विमान तिकीट दर प्रत्येकी २३००० रुपये असताना, प्रत्येकी आठ हजार रुपयांत या सर्व चार्टर्ड फ्लाईट्स केरळमध्ये लँड झाल्या आहेत. तिकीट दर कमी करून देण्यासाठी केरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्राने पुढाकार घेतला होता.
हे सर्व अनिवासी भारतीय वाताकरा, कासारगोड, कन्नूर, मल्लापुरम, कोझिकोडे, पल्लकड, पोनामी आणि वायनाड येथे राहणारे आहेत. सौदी अरेबियामध्ये असलेल्या केएमसीसीच्या युनिटमधील काही सदस्यांनी खास इकडे येऊन मागील दोन महिने प्रचार रॅली केरळात काढल्या आहेत. मल्लापुरम येथे जेद्दाह युनिट तर्फे सर्वात मोठी रॅली काढण्यात आली होती. त्यांचे जनरल सेक्रेटरी अन्वर नहार यांनी, आम्ही पक्के राजकारणी असून आमच्या रक्तातच राजकारण आहे, त्यामुळे प्रत्येक निवडणूक आमच्यासाठी महत्वाची असते असे सांगितले. तर इतर काही सदस्यांनी, केरळ मुस्लिम सांस्कृतिक केंद्राची टीम ठीकठिकाणी फिरून वीस लाख मतदारांपर्यंत पोहचली असून भारत देशाला वाचवायचे असेल तर योग्य उमेदवाराला मतदान करायला आम्ही सांगत आहोत असे स्पष्ट केले. इकडे यायच्या आधी आम्ही सोशल मीडियामधून देखील प्रचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सौदी अरेबियामध्ये भारताचे नाव अतिशय खराब झाले असून, तेथील जुने आणि वृद्ध नागरिक इंदिरा गांधी यांची आठवण काढतात, त्यांचे असणारे सौदी राष्ट्रांबरोबरचे संबंध याचे अनेक किस्से सांगतात, पण आताच्या सरकारच्या पॉलिसीमुळे भारताकडे वेगळ्या नजरेने बघितले जाऊ लागले आहे आणि त्यामुळे आम्ही हा प्रचार करत असल्याचेही स्पष्ट केले.
वाताकारा लोकसभा मतदारसंघात यातील बहुतांश अनिवासी भारतीय आलेले आहेत. इथून पल्लकडचे आमदार शफी पेरांबिल हे काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या समोर सीपीआय (एम) च्या मत्तानुरच्या आमदार के के शैलजा निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने येथून प्रफुल्ल कृष्णा यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघात ८२.४८ टक्के इतके प्रचंड मतदान झाले होते आणि इथून काँग्रेसचे के मुरलीधरन खासदार म्हणून निवडून गेले होते. मात्र यावेळी काँग्रेसने या मतदारसंघात शफी परांबिल यांच्या रूपाने मुस्लिम उमेदवार दिला आहे.
आखाती देशातून खास प्रत्येक निवडणुकीसाठी अनिवासी भारतीय येत असतातच. अगदी नगरपालिका निवडणुकीत पण इथे अनेक जण येतात. पण यावेळी ही संख्या लक्षणीय असल्याचे केरळातील ख्यातनाम कॅमेरामन मनू शेली यांनी सांगितले. यावेळी आखाती देशात खास शफी पेरांबिल यांच्यासाठी प्रचार सभा घेण्यात आली, उमेदवार शफी यांनी या सभेत उपस्थित राहून तेथील अनिवासी भारतीयांशी संवाद साधत मतदानाला येण्याचे आवाहन केले. ज्यांना ईद व विशु या दोन सणांना जोडून सुट्ट्या घेता आल्या त्यांनी मोठ्या कालावधीच्या सुट्ट्या घेतल्या, पण ज्यांना सुट्ट्या मिळाल्या नाहीत ते गुरुवारी २५ तारखेला रात्रीपर्यंत मतदारसंघात येऊन लगेच २७ तारखेला सकाळी परत जाणार आहेत असेही शेली यांनी सांगितले.
वोट विमानम च्या मोहिमेनंतर, खासकरून कोझिकोडे, कासारगोड, मल्लापुरम, कन्नूर, पोनामी, पल्लकड, वायनाड या ठिकाणी किती मतदान होते हे पाहणे त्यामुळेच औत्सुक्याचे ठरणार आहे.