मुंबई : कोल्हापूर लोकसभेची (Kolhapur Lok Sabha) निवडणूक यावेळी दोन राज घराण्यांत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपतींना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित मानण्यात येतंय. हा मतदारसंघ शिवसेनेचा असला तरी काँग्रेसच्या चिन्हावर शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu) मविआचे (MVA) उमेदवार असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं मानण्यात येतंय. अशा परिस्थितीत छत्रपतींच्या घराण्यातील उमेदवारासमोर दुसरा तेवढाच मात्तबर घराण्याचा उमेदवार महायुतीकडून रिंगणात उतरवली जाण्याची चर्चा सध्या सुरुये.
समरजीत सिंह घाटगेंना भाजपाकडून उमेदवारी?
एकीकडे शाहू छत्रपती रिंगणात उतरत असताना, त्यांच्यापुढे तुल्यबळ उमेदवाराचा शोध कोल्हापुरात महायुतीकडून (Mahayuti) पूर्ण झाल्याचं मानण्यात येतंय. छत्रपती शाहू महाराज ज्या घराण्यातून दत्तक आले, त्या कागलच्या घाटगे घराण्यातील समरजीतसिंह घाटगे यांना भाजपाकडून लोकसभेचं तिकिट दिलं जाणार अशी चर्चा सध्या सुरुये. भाजपाच्या वरिषअ्ठ पातळीवर यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र यावर समरजितसिंह हे सध्या मौन बाळगून आहेत.
शिंदे शिवसेनेच्या हातातून कोल्हापूर जाणार?
सध्या कोल्हापुरातून शिवसेनेचे संजय मंडलिक हे खासदार आहेत. सेनेतल्या बंडानंतर ते शिंदेंच्या सोबत गेलेले आहेत. कोल्हापुरातील बदललेली राजकीय स्थिती पाहता, ही जागा शिंदेंची शिवसेनाच जिंकेल असं सांगण्यात येत होतं. मात्र शरद पवार यांच्या आग्रहानंतर ही जागा मविआकडून शाहू छत्रपतींना मिळणार हे जवळपास स्पष्ट झालंय. राजघराण्यातील शाहू छत्रपतींना आव्हान देण्यासाठी तोलामोलाचा चेहरा म्हणून समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळं ही जागाही शिंदेंच्या शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
घाटगेंचा मुश्रीफविरोधही मावळणार?
कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे असा संघर्ष होता. मुश्रीफ महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर समरजीतसिंह घाटगे नाराज झाल्याच्या बातम्या होत्या. त्यानंतर त्यांनी फडणवीसांशी भेट घेतल्यानंतर विरोोध मावळला होता. आता घाटगे लोकसभेला गेल्यास मुश्रिफांचा मार्गही मोकळा होणार असल्याचे संकेत मिळतायेत.