जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा
नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडावा, यासाठी योग्य नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते विकास आणि साधूग्रामच्या भूसंपादन प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA), कुंभमेळा व त्यासंदर्भातील विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, NMRDAचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कुंभमेळ्यासाठी प्राधान्याने कामे पूर्ण करण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासन प्राधान्याने कामे हाती घेणार आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, गरज असल्यास रस्त्यांचा विस्तार तातडीने करण्यात यावा.
गोदावरी नदीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. जलप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात. मल:निस्सारण आणि जलशुद्धीकरणासंबंधी प्रस्ताव राज्य शासनाकडे तातडीने पाठवावेत, जेणेकरून आवश्यक निधी मंजूर केला जाईल.
सीसीटीव्ही आणि सुरक्षाव्यवस्थेसाठी समन्वयाची गरज
कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सीसीटीव्ही आणि ध्वनिक्षेपक यंत्रणेचे अद्ययावत नियोजन करावे. नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांनी एकत्रित समन्वयाने सुरक्षा यंत्रणा उभारावी, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले.
प्रयागराज कुंभमेळ्याच्या नियोजनाचा अभ्यास करावा
प्रयागराज येथे कुंभमेळ्यात अमलात आणलेल्या यशस्वी उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करावा. त्यातून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी होईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
रामकालपथ, मोनोरेल आणि NMRDA प्रकल्पांचा आढावा
या बैठकीत रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (NMRDA) प्रकल्प आणि मोनोरेल प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला.
गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष उपाययोजना – मंत्री दादाजी भुसे
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी गोदावरी नदीच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, गोदावरी नदीच्या पात्रात कोणतेही दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
कुंभमेळ्याच्या जागतिक स्तरावरील महत्त्वावर भर
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बैठकीत सादरीकरणाद्वारे कुंभमेळ्याच्या नियोजनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा कुंभमेळा “शून्य अपघात, सुखद आणि आध्यात्मिक” करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, या मेळ्याच्या माध्यमातून नाशिक शहराला जागतिक पातळीवर ओळख मिळावी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
नियमित आढावा बैठक होणार
कुंभमेळ्यासाठी हाती घेतलेल्या कामांची नियमितपणे आढावा बैठक घेतली जाणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांचा प्रयागराज दौरा आयोजित केला जाणार आहे, असेही डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या उपाययोजनांची माहिती
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनीही कुंभमेळ्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना मांडल्या.