मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली असून टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे.त्यामुळेच जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस राहिले असून २३ तारखेला हे सरकार पायउतार होईल,अशी घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी गुरूवारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना केली.
खेरा म्हणाले की,शिंदे भाजपा सरकारने पुणे रिंग रोड,समृद्धी महामार्ग,जलयुक्त शिवार,रुग्णवाहिका खरेदी,धारावी पुनर्वसन प्रकल्प,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करुन जनतेचा पैसा लुटला आहे.इतकेच नव्हे शिंदे फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराची यादी यापेक्षा फार मोठी आहे.या सरकारने महाराष्ट्रात येणारे तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असेलले प्रकल्पही गुजरात व इतर राज्यात जाऊ दिले.यामुळे महाराष्ट्रातील १० लाख रोजगार हिरावले व राज्यातील सुशिक्षित तरुण बेरोजगारच राहिले.त्यामुळे महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून हीच शिंदे भाजपा सरकारची कामगिरी असल्याचा गंभीर आरोपही खेरा यांनी केला.
भाजप म्हणजे ‘बहुत झुठी पार्टी’ असून या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदींपासून खालपर्यंत सर्वच जण सातत्याने खोटे बोलत असतात.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार,एमएसपी लागू करणार अशी आश्वासने दिली.हरियाणा निवडणुकीवेळी तर ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. पण यातील एकही आश्वासन भाजपाने पूर्ण केलेले नाही. मात्र काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणीही केलेली असून कर्नाटक,तेलंगणा,हिमाचल प्रदेशात ज्या गॅरंटी जाहीर केल्या होत्या त्याची अंमलबजवाणी सुरु आहे.त्यामुळे महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या ५ गॅरंटी लागू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही खेरा यांनी यावेळी स्पष्ट केले.