मुंबई: केवळ टोलेजंग इमारती किंवा भव्य रस्ते म्हणजेच विकास नव्हे तर नागरिकांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि शहर त्यांच्यासाठी राहण्यायोग्य बनवणे फार महत्वाचे असते. केवळ विकास आराखडा तयार करुन विकास नियोजन अभियंत्यांची जबाबदारी संपत नाही तर त्याची अंमलबजावणी होऊन शहराला राहण्यायोग्य बनविणे हीसुद्धा त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे, महानगरपालिकेच्या विकास नियोजन विभागात कार्यरत प्रत्येक अधिकारी व अभियंत्यांनी सक्रिय होऊन अत्यंत सजगतेने कार्य करावे. विकास आराखडा बनवताना सुविधांच्या उपलब्धतेसोबतच नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या.
विकास नियोजन विभागाच्या कामकाजाचा श्री. गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ७ नोव्हेंबर २०२४) आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
माजी सनदी अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेंटर फॉर कपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्चचे (एमसीएमसीआर) महासंचालक डॉ. रमानाथ झा, महानगरपालिका सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) श्री. सुनील राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंता यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला विकास नियोजन विभागाचे कामकाज, विकास आराखडा, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उपलब्ध जागा आणि त्यावरील आरक्षण, विकास आरखडा विभागाच्या गरजा आणि अडचणी आदींबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावर श्री. गगराणी यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या.
श्री. गगराणी म्हणाले, शहराचा विकास आराखडा बनवणे इतकेच महत्वाचे नसते तर त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होणेही गरजेचे असते. ज्या कारणांसाठी विकास आराखडा बनवला आहे त्यानुसारच त्यावर अंमलबजावणी व्हायला हवी. विकास आराखडा बनवताना आवश्यक सुविधा आणि नागरिकांच्या मागण्या यांचा विचार प्रकर्षाने केला जावा. प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर कार्यरत असलेले विकास नियोजनाशी संबंधित अभियंत्यांनी प्रत्येक वॉर्डला स्वतंत्र शहर गृहित धरुन त्यानुसार आराखडा तयार करण्यास प्राधान्य द्यावे. वॉर्डस्तरावरील उपलब्ध जागा, आरक्षण आदींच्या मागील दहा वर्षांमधील आकडेवारीचा अभ्यास करुन पुढील नियोजन करावे. प्रत्येकाने सक्रियता दाखवून प्रत्येक वॉर्डस्तरावर कार्य करावे व विकास आराखड्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष पुरवावे, असे आवाहनही श्री. गगराणी यांनी यावेळी केले.
माजी सनदी अधिकारी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेंटर फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्चचे (एमसीएमसीआर) महासंचालक डॉ. रमानाथ झा म्हणाले की, विविध प्रशासकीय पदांवर आणि महानगरपालिकांमध्ये काम केल्याच्या प्रदीर्घ अनुभवांच्या आधारे मी हे ठामपणे सांगतो की, बृहन्मुंबई महानगरपालिका ही सर्वात प्रभावी आणि उत्तम महानगरपालिका आहे. विकास नियोजनाच्या बाबतीत अभियंत्यांनी प्राधान्यक्रम निश्चित करुन काम करावे. विकास आराखड्यावरील अंमलबजावणीवर कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. विकास नियोजन आराखड्यात शहराची आर्थिक उत्पादकता, मनुष्यबळ उत्पादकता आणि नागरिकांच्या जीवनविषयक गुणवत्तेचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आयुक्त श्री. गगराणी यांनी उपस्थित अभियंता, अधिकारी यांच्या कामकाजातील अडचणी, समस्या याबाबतही चर्चा केली. तसेच उत्पादकता आणि अद्ययावत ज्ञान व कौशल्ये वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीकोनातून वेळोवेळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्याच्याही सूचना दिल्या.