नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत अकरा महिने पूर्ण केलेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या युवकांवर बेछुट लाठीमार झाल्याचा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत तीव्रतेने गाजला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या वेळी हा विषय अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. या मुद्द्यावर अनेक ज्येष्ठ सदस्य उभे राहून शासनाकडून ठोस आणि स्पष्ट उत्तराची मागणी करत होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाची बाजू मांडल्याने विरोधी सदस्य अधिकच संतप्त झाले.
या विषयावर राहुल पाटील आणि अमित साटम यांच्या लक्षवेधीही पाठोपाठ होत्या. राहुल पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी, “या योजनेसाठी 418 कोटी 18 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून योजना सुरू राहील,” असे सांगितले.
यानंतर भाजप सदस्य अमित साटम यांची लक्षवेधी पुकारण्यात आली. “या प्रशिक्षणार्थींना रोजगार किंवा स्वयंरोजगारासाठी सरकार काय करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी या युवकांना सेवेत कायम न करणे म्हणजे सरकारचा विश्वासघात असल्याचा आरोप केला आणि त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी केली. भाजप सदस्य योगेश सागर यांनीही हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, “या मुलांवर अन्याय होऊ नये,” अशी भूमिका मांडली.
वडेट्टीवार यांनी संतप्त सुरात विचारले, “नोकरी मागणाऱ्या या मुलांवर बेछुट लाठीमार का केला? अनेकांना फ्रॅक्चर का झाले? शिंदे–फडणवीस सरकारने त्यांना सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार हरकत घेतली. त्यानंतर जयंत पाटील यांनी, “आम्ही संबंधित मंत्र्यांना प्रश्न विचारतो, मग दुसरे मंत्री उत्तर का देतात?” अशी हरकत नोंदवली.
विजय वडेट्टीवार यांनी हरकतीच्या मुद्द्यावरून सरकारने ठोस उत्तर द्यावे अशी मागणी लावून धरली. नाना पटोले, वडेट्टीवार, जयंत पाटील, राहुल पाटील, भास्कर जाधव यांच्यासह अनेक सदस्य उभे राहून या प्रशिक्षणार्थी युवकांना न्याय देण्याची मागणी करत होते.
अखेर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, “ही मूळ योजना कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी नव्हती, तर प्रशिक्षणासाठी होती.” तथापि, “या युवकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्यासाठी शासन विशेष योजना आणत असून सर्वांना त्याचा लाभ होईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

