सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेले ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे विकसित मनांचा उत्सव असतो. साहित्य संमेलने होणे अत्यावश्यक आहे; मात्र या संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्षांना सन्मान मिळालाच पाहिजे. राजकीय व्यक्तींना अनाठायी मान देऊन संमेलनाध्यक्षांना कोपऱ्यात बसवणे अजिबात योग्य नाही, असे सडेतोड मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख मंडपात डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. प्रविण बांदेकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. या मुलाखतीला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
साहित्यातील ‘स्त्री’ प्रतिमेवर परखड भाष्य
अनुराधा पाटील यांनी साहित्यातील स्त्री प्रतिमांबाबत परखड मते मांडली. आजवर फक्त सात महिला साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे हे लाजिरवाणे असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
भालचंद्र नेमाडे हे आपले आवडते कादंबरीकार असले, तरी त्यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा धक्कादायक वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जी. ए. कुलकर्णी यांनी रंगवलेली स्त्री प्रतिमाही टोचणारी आहे. याउलट, कवी नारायण सुर्वे यांच्या लेखनातील स्त्री अधिक मानवी आणि जवळची वाटते, असे त्या म्हणाल्या.
साहित्यातील स्त्री ही केवळ उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नसावी, ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय सामाजिक जाणीवा प्रगल्भ होणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. जाहिरातींमध्ये पुरुषी नजरेतून पाहिलेली स्त्रीच दिसते, तसेच मराठी समीक्षेतही ‘स्त्री’ आणि लेखिकांचे साहित्य दुर्मीळ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
वारी, शेतकरी आणि कर्जबाजारीपणाची वेदना
वारी परंपरेविषयी बोलताना अनुराधा पाटील म्हणाल्या की, वारीकडे बहुजनांच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. शेतकरी कर्ज काढूनही वारी करतो; मात्र कर्जबाजारी होऊन सर्व काही गमावल्यावर देवावरच नव्हे तर माणसावरही विश्वास उरत नाही. महाराष्ट्रात कर्जामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
राजकारणात मूल्यांचा ऱ्हास; स्त्रियांसाठी वाढती भीती
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टोकदार भाष्य करताना त्या म्हणाल्या, “आजचे राजकारण विधी-निषेधशून्य झाले असून मानवी मूल्ये बुडत चालली आहेत. पक्ष बदलणाऱ्यांना मतदार जाब विचारत नाहीत. रणरागिणी फक्त पक्षापुरत्याच मर्यादित राहतात.”
राजकारणात स्त्रियांचा प्रवेश हा अधिक चिंतेचा विषय असल्याचे सांगत, मोजक्या घराण्यांतील स्त्रियांचे राजकारण सुरक्षित असते, मात्र इतर स्त्रियांना सतत भीती आणि दबावाखाली वावरावे लागते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
कवितेने समारोप
श्रोत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात मुलाखतीच्या अखेरीस, आग्रहास्तव अनुराधा पाटील यांनी ‘त्या होतात’ या कवितेचे प्रभावी वाचन केले.

