X: @therajkaran
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुढील तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे मनसेचा वर्धापनदिनही मनसेचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. शनिवारी ९ मार्च रोजी नाशिकमधील दादासाहेब गायकवाज सभागृहात मनसेचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचं अधिवेशन आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज ठाकरे महायुती सोबत जाण्याची काही घोषणा करणार की स्वबळाचा नारा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेले आहे.
नाशिकवर सर्वच पक्षांचा डोळा असून अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरेंनीही नाशिक दौरा केला होता. आता राज ठाकरे देखील लोकसभेपूर्वी नाशिक दौरा करीत काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. आज गुरुवारी ७ मार्च रोजी सायंकाळी राज नाशिक शहरात पोहोचतील. यानंतर शुक्रवारी ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ते पंचवटीतील काळाराम मंदिरात सहकुटुंब महाआरती करणार आहेत. दिवसवर विविध पक्षांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानंतर ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठका घेऊन आगामी निवडणुकीचा आढावा घेणार आहे. शनिवारी ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिनानिमित्त पक्षाचं अधिवेशन आणि मेळावा पार पडेल.
कार्यकर्त्यांकडूनही नाशिक शहरात शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक उभारण्यात आले आहे. काही कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले फलक शहरभर लावले आहेत. मनसेच्या वतीने शहरभर लावलेल्या फलकावर ‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’ हा मजकूर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. ‘लढण्याची हिंमत ठेवणार संपत नसतो! लढायचं ते जिंकण्यासाठीच..’ असं फलकावर लिहिण्यात आलं आहे.