मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एके ठिकाणी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रण नसल्याचं सांगतात, तर दुसऱ्याच ट्विटमध्ये शरद पवारांनी ६ मार्चला चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचीही माहिती देतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आणि मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वंचित आणि मविआमध्ये तणाव असल्याची काही कारणं समोर आली आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी आज रविवारी अकोल्यातील पत्रकार परिषदेत वंचितच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. यात अकोल्यातून ते स्वत:, वर्ध्यातून प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे हा पेच अधिक वाढला आहे.
आधीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी मविआकडे २७ जागांची मागणी केली होती. मविआच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार आणि ३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत अशीही मागणी केली होती. मात्र वंचितच्या या प्रस्तावावर अद्याप मविआकडून निरोप कळवण्यात आलेला नाही, असं समजते. याशिवाय मविआने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी केली होती, मात्र यावरही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.