महाराष्ट्र ताज्या बातम्या

LoP Ambadas Danve: क्या हुआ तेरा वादा?; १२ जूनला जिल्हानिहाय चक्का जाम आंदोलन

छत्रपती संभाजीनगर/मुंबई – कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, ४५ हजार पाणंद रस्ते, अन्नदाता ऊर्जादाता, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, खतावरील जीएसटी अनुदानात परत आणि एक रुपयात पीकविमा अशा ढीगभर वचनांचा ढोल बडवून सत्तेत आलेलं हे सरकार आता सगळं विसरलंय. सत्तेच्या खुर्चीवर बसताच या सरकारने जनतेची फसवणूक केली. म्हणूनच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या या तिहेरी सरकारला आम्ही विचारतो, ‘क्या हुआ तेरा वादा?’ असा खणखणीत सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेतून विचारलाय.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना दानवे म्हणाले की, महायुती सरकारने मोठ्या गाजावाजाने जाहीर केलेल्या अनेक योजना आणि दिलेली आश्वासने आज केवळ कागदावरच राहिली आहेत. यामुळे शेतकरी प्रचंड निराशेच्या गर्तेत ढकलली गेली असून, अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे. महायुतीने शेतकऱ्यांना लगोलग कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला, तसेच वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही.

ते म्हणाले, सरकारने सरड्याला लाजवेल इतका वेगाने रंग बदलला. कर्जमाफीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक वर्ष संपत आले असताना कर्ज भरण्यासाठी सांगून अर्थमंत्री अजित पवारांनी त्यांची क्रूर थट्टा केली. याचाच परिणाम म्हणून, गेल्या सात महिन्यांत राज्यात १००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकऱ्यांच्या मार्फत राज्याच्या तिजोरीत जाणारा जीएसटी अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत करण्याच्या बाता मारल्या, मात्र जीएसटी अद्याप शेतकऱ्यांच्या वाट्याला आलाच नाही. सोयाबीन आणि कापसाचे भाव पाडण्यासाठी परदेशातून हे पीक आयात करण्याचे फतवे काढले जात आहेत. शेतकरी सन्मान योजनेची रक्कम १२ हजारांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन केवळ ‘बाजार गप्पा’ ठरले आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

शेतमाल खराब न होण्यासाठी शीतगृहे देण्याचे बोलले, पण आज पावसाने खराब झालेल्या पिकाचे नुकसानही सरकारला उघड्या डोळ्याने दिसेनासे झाले आहे, असेही दानवे म्हणाले.

हमीभावाची ‘दीडपट’ भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. सरकार फक्त कागदावर आकडेवारीचा खेळ करते आणि प्रत्यक्षात अन्नदात्याला वाऱ्यावर सोडून, त्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘एक रुपयात पीकविमा’ योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. ती योजना आता बंद केली असून, विमा कंपन्यांनी दीड लाख कोटींपेक्षा जास्त प्रीमियम गोळा करून ५० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम स्वतःच्या खिशात घातली आहे. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई सोडाच, साधे पंचनामेही झालेले नाहीत. ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली. शेतकऱ्यांचे हाल अजूनही तसेच आहेत, कारण आश्वासनांची पूर्तता कधी होणार हे कुणालाच माहित नाही. “अन्नदाता बनेल ऊर्जादाता” ही योजना केवळ एक निव्वळ धूळफेक आहे. आजही अनेक शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहेत. सबसिडीचे आकडे मोठे असले तरी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, आणि ‘ऊर्जादाता’ बनण्याऐवजी ‘अन्नदाता’ आजही अंधारातच आहे. ‘हर घर जल, हर घर छत’ या योजनांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने दाखवली खरी, पण अंमलबजावणीतील त्रुटी, भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळे जनतेची घोर निराशा झाली आहे. घोषणा करून दिशाभूल करण्याऐवजी, सरकारने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा हे केवळ ‘जुमले’ ठरतील अशी भीती व्यक्त होत आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाची उपेक्षा हे या सरकारचे एक मोठे अपयश आहे. २०१८ पासून ४० ते ४५ हजार कोटींचा हा प्रकल्प केवळ कागदावरच रेंगाळत आहे, तर मराठवाडा आजही टँकरच्या पाण्यावरच तग धरून आहे. निधीचा अभाव, राजकीय इच्छाशक्तीची कमतरता आणि अंमलबजावणीतील दिरंगाई यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ घोषणांचा पाऊस ठरला असून, मराठवाड्याची तहान कायम आहे.

लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम सोडाच, पण आहे ती रक्कमही वेळेत देण्यास सरकार तयार नाही. तब्बल आठ लाख महिलांच्या लाभावर फुली मारून सरकारने विश्वासघात केला आहे. ‘उज्वला गॅस योजना’ कोणत्या अडगळीत पडली आहे, हे सरकारलाही माहिती नाही. ‘दीड हजार देतो ना.. मग काही मागू नका..’ अशा अविर्भावात मंत्री वागतात, तर मग महिलांनी सुरक्षा पण मागू नये का? सरकारी आकडे सांगतात की महाराष्ट्रातून दररोज ७० महिला बेपत्ता होतात. २०२३ साली ७५२१ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली, तरी महिला आयोगाची दातखीळ बसलेली आहे. २५ हजार महिलांची पोलीस भरती करण्याचे ‘नकली’ आश्वासनही हवेतच विरले आहे.

इतकेच नव्हे तर या सरकारने वृद्धांची ही फसवणूक केली. पेन्शनमध्ये वाढ करून २१०० रुपये देण्याचे आणि सरकारी दवाखान्यात स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, आज एकही बाह्य रुग्ण कक्ष सुरू झालेला नाही, उलट महिलांच्या रस्त्यावर होणाऱ्या प्रसूती ही सामान्य बाब बनली आहे.

२५ लाख नोकऱ्या आणि १० हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात ना नोकऱ्या मिळाल्या ना विद्यावेतन. ‘छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र’ आणि एरोनॉटिकल हबची स्वप्ने दाखवून तरुणाईला उल्लू बनवले आहे, ज्यामुळे आज फक्त भयंकर बेरोजगारी दारोदारी फिरताना दिसत आहे.

क्या हुआ तेरा वादा? या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासन आणि प्रशासनाचे लक्ष राज्यातील, विशेषतः मराठवाड्यातील, या गंभीर आणि मूलभूत समस्यांकडे वेधत आहोत. केवळ पोकळ आश्वासने आणि घोषणाबाजी करण्याऐवजी, सरकारने तात्काळ या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि राज्यातील जनतेला न्याय द्यावा. अन्यथा, जनतेचा असंतोष उद्रेक करेल, असा इशाराही दानवे यांनी यावेळी दिला.

बुधवारी ट्रॅक्टर मोर्चा, गुरुवारी चक्का जाम

‘क्या हुआ तेरा वादा?’ अंतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप ४५९० पेक्षा अधिक ग्रामपंचायती, ६८ तालुक्यांतून सरकारला निवेदनाद्वारे जाब विचारात व्यक्त झाला. त्याचप्रमाणे सत्ताधारी आमदार, मंत्र्यांनाही टार्गेट करीत त्यांनाही शिवसैनिकांतर्फे निवेदन देण्यात आले. इतकेच नव्हे तर शिवसेनेने १०८० ग्रामसभांतून दणका दिला. ११ जूनला तालुका निहाय ट्रॅक्टर मोर्चा, १२ जूनला जिल्हा निहाय चक्का जाम करणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी पत्रकारांना दिली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात