X: @vivekbhavsar
मुंबई: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील लोकलसेवा आणि प्रवासी सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कार्यालये एकाच वेळेस सुरू होत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी लोकल सेवांवर प्रचंड ताण येतो. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी कार्यालयीन वेळांचे व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची आणि दीर्घकालीन उपाययोजना ठरू शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
“मंत्रालय आणि सरकारी कार्यालयांच्या वेळा आम्ही आधीच लवचिक केल्या आहेत. आता खासगी आस्थापनांनीही पुढाकार घेत कार्यालयीन वेळांचे पुनर्नियोजन करावे,” असे आवाहन त्यांनी केले. राजकारण शी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “रेल्वेस्थानकांवरील गर्दी नियोजनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याबाबत आम्ही रेल्वे प्रशासनाला शिफारस करू.”
मुंबईतील लोकल सेवांचे वेळापत्रक ठरलेले असून, सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेतच सर्वाधिक प्रवास होतो. उपनगरांमधून शहराच्या दिशेने सकाळी होणारा आणि संध्याकाळी उलट प्रवास करत घराकडे जाणारा हा मुख्य प्रवाह आहे. या दोन वेळातच स्टेशनांवर आणि लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. यामुळे कार्यालयीन वेळा लवचिक केल्यास गर्दीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
सध्याच्या घडीला विविध यंत्रणांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. रेल्वेच्या सिग्नलिंग प्रणालीतही एआयचा समावेश करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानाचा उपयोग गर्दी नियंत्रणासाठी देखील करता येईल का, याची चाचपणी करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. “स्टेशनांवरील प्रवासी संख्येचे विश्लेषण, प्रवाहाची दिशा, शिखर वेळा आणि सेवा नियोजन यासाठी एआयचा उपयोग केला जाऊ शकतो,” असे ते म्हणाले.
“खासगी आस्थापनांना कार्यालयीन वेळा बदलण्यात काही अडचणी असू शकतात, पण सार्वजनिक हितासाठी त्यांनी काही प्रमाणात लवचिकता दाखवली, तर मुंबईतील लोकलवरील ताण कमी होण्यास मदत होईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. “हे केवळ सरकारचे काम नाही, तर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पुढे जाण्याची वेळ आहे,” असा संदेश त्यांनी दिला.