Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष या सुनावणीकडे आहे. त्यामुळे शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे. जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावे की नक्की काय होत आहे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी विधानसभा अध्यक्षांकडे एका पत्राद्वारे केली.
संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणी लाईव्ह प्रक्षेपण होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी आपल्या पत्रात मांडले आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांना दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार २५ सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार असल्याची माहितीही देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केली आहे.