Twitter : @NalavadeAnant
मुंबई
पुणे जिल्ह्यातील जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून सरकारच्या या भूमिकेमुळे हे सरकार कामगार विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सुरु असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘टोल’ आंदोलनाचे समर्थन करत टोलचा पैसा जातो कुठे? असाही प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले.
आज विधानभवन येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरले.
वडेट्टीवार म्हणाले, जनरल मोटर्स कंपनीच्या (General Motors) कामगार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कामगार विरोधी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi government) या कंपनीचे हस्तांतरण केले नव्हते. कामगारांचे हित जोपासले होते. विरोधी पक्षात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कामगारांची बाजू घेतली होती. पण सत्तेत गेल्यावर त्यांनी भूमिका बदलली. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांशी कोणतीही चर्चा न करता कारवाई सुरु केली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने कामगारांचे हित जोपासले पाहिजे, अशी भूमिकाही वडेट्टीवार यांनी मांडली.
पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी चौकशी करा
राज्यात पेपर फुटल्याशिवाय परीक्षा होत नाहीत. या पेपर फुटीला कोणाची फूस आहे की सरकारच्या आशीर्वादाने हे प्रकरण सुरु आहे असा सवाल करत पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी मार्फत चोकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. पेपर फुटीमुळे युवकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सरकरचे हे अपयश असून सर्वच परीक्षा एमपीएसीच्या (MPSC) नियंत्रणात आणाव्यात अशी मागणीही वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.
टोल आंदोलनाचे समर्थन
मनसे नेते राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांची टोल संदर्भातील भूमिका योग्य असून टोल आंदोलनाला समर्थन असल्याचे वडेट्टीवार यांनी ठामपणे नमूद केले. आज गेली अनेक वर्षे राजरोसपणे टोल वसुली सुरु असून टोलचा पैसा नेमका जातो कुठे असा खडा सवालही त्यांनी सरकारला विचारला.