महाराष्ट्र

महाड : हेल्थकेअर कंपनीतील स्फोट; जिल्हाधिकाऱ्यांच्या  अध्यक्षतेखालील समिती बरखास्तीची मागणी

Twitter : @milindmane70

महाड

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये (blast in Blue Jet Healthcare company) झालेल्या 11 कामगारांच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती निपक्षपाती काम करेल, याबाबत साशंकता व्यक्त करत ही समिती बरखास्त करा, असा इशारा महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे समन्वयक व शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अन्यथा समितीच्या विरोधात न्यायालयात जाऊ असाही इशारा दिल आहे.

हेल्थकेअर कंपनीमध्ये 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात व त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये कंपनीतील 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या कामगारांच्या मृत्यूप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हशे (Raigad Collector IAS Yogesh Mhase) यांनी महाडचे उपविभागीय प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची चौकशी समिती गठीत केली आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरलया, पनवेल येथील कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ, महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. हजारे, महावितरणचे गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील, महाड येथील अग्निशामक दलाचे (Fire Brigade) अधिकारी प्रवीण घोलप व महाडचे तहसीलदार महेश शितोळे या सदस्यांचा या समितीमध्ये समावेश आहे.  

या कामगारांच्या मृत्यू प्रकरणात महाड विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समन्वयक व शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी महाडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असताना त्यांना या चौकशी समितीमध्ये समाविष्ट करून घेतल्याने कंपनीची चौकशी नि:पक्षपाती कशी होईल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ही समिती बरखास्त करावी, अन्यथा मी न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाडचे आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांचे पुत्र विकास गोगावले (Vikas Gogawale) यांचा या कंपनीशी कोणता थेट संबंध आहे? असा सवाल करून विकास गोगावले यांच्याकडे कोणतेही शासकीय पद नसताना ते मृत कामगारांच्या नातेवाईकांना शासकीय धनादेशाचे वाटप शासकीय अधिकाऱ्यांसमवेत कोणत्या अधिकाराने करतात? असा सवाल ओझर्डे यांनी उपस्थित केला. ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी विरोधात कारवाई करण्यासंदर्भात आमदार गोगावले का भूमिका घेत नाहीत? असा सवाल देखील ओझर्डे यांनी या निमित्ताने उपस्थित केला.

विकास गोगावले हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत, असे सांगून ओझर्डे म्हणाले की, केवळ कंपनीतून भंगार विकायचा आहे व स्वतःचं पोट भरायचे आहे, विकास गोगावले यांची स्वतःची काही ओळख नाही, केवळ आमदाराचा मुलगा म्हणून त्यांची ओळख आहे. कोणावर टीका करताना आपली स्वतःची ताकद ओळखून टीका करावी, विकास गोगावले यांच्याकडे जे पद आहे ते अधिकृत रजिस्टर आहे का? असा सवाल देखील ओझर्डे यांनी उपस्थित केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी बंदुकीचा परवाना कसा दिला?

विकास गोगावले यांच्यावर तडीपारीचा गुन्हा तसेच अन्य गुन्हे दाखल असताना त्यांना बंदुकीचा परवाना रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कसा दिला? असा सवाल देखील ओझर्डे यांनी उपस्थित केला. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे हे विकास गोगावले यांच्यासमोर थरथर कापतात, असा दावा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असताना या कंपनीला उत्पादन सुरू करू देण्यासाठी सी. ई. टी. पी चे अध्यक्ष संभाजी पठारे यांनी ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले? परवानगी कोणत्या आधारे दिली? असा सवाल ओझर्डे यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी आपल्या कंपनीचे उत्पादन सुरू करण्यासंदर्भात महाड सीईटीपीकडे अनेक दिवसांपासून अर्ज केले आहेत, मात्र त्यांच्या अर्जांना अजूनही परवानगी दिलेली नाही, मात्र, त्यानंतर अर्ज दाखल केलेल्या कंपनीला कशी काय परवानगी दिली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेल्थकेअर कंपनीमधील कामगारांच्या मृत्यूच्या जीवाची किंमत ठरवण्याचा अधिकार आमदार गोगावले व त्यांच्या पुत्राला आहे का? असा सवाल देखील ओझर्डे यांनी उपस्थित केला. समृद्धी महामार्गावर अपघात घडला तर मुख्यमंत्री लागलीच त्या ठिकाणी भेट देतात. मात्र, ज्या दिवशी हेल्थकेअर कंपनीमध्ये अपघात घडला, त्याच दिवशी मुख्यमंत्री हे महाबळेश्वरमधील त्यांच्या दरे या गावी शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. आमदार गोगावले हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे असताना देखील ते या ठिकाणी उपस्थित का राहिले नाहीत? किंवा त्यांनी का पाहणी केली नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

मृतांच्या कुटुंबियांना मदत वाटपाचे धनादेश विकास गोगावले यांच्या हस्ते देण्यामागे विकास गोगावले हे कंपनीचे मालक आहेत की कंपनीचे भागीदार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित करून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम विकास गोगावले यांनी केले आहे, असा गंभीर आरोप ओझर्डे यांनी केला. एवढं घाणेरडे राजकारण विकास गोगावले करीत असून कंपन्यांमध्ये घातक रसायनांचे उत्पादन घेतले जात आहे. कागदावर एक उत्पादन घेतलेले दाखवायचे व प्रत्यक्षात कंपनीमध्ये दुसरेच उत्पादन घ्यायचे, असा रीतीरीवाज औद्योगिक कंपन्यांमधील अनेक कंपन्यांमध्ये होत असून त्या कंपन्यांची नावे मी लवकरच जाहीर करणार आहे, तसेच या कंपन्यांमधील 11 कामगारांच्या मृत कुटुंबीयांना समान निधीचे वाटप न झाल्यास मी कंपनी विरोधात न्यायालयात पिटीशन दाखल करील, असा इशारा सोमनाथ ओझर्डे यांनी दिला आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात